सध्या सायबर क्राईमच्या घटना वाढल्या आहेत. यात सध्या लोन अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. अशी ऑनलाइन फसवणूक केवळ याच माध्यमातून होत नाही, तर अन्य शासकीय सुविधांच्या माध्यमातून खोटी प्रलोभने दाखवूनही ऑनलाइन फसवणूक केली जाते.
ज्येष्ठ नागरीक बनतात टार्गेट
विशेषतः ही आर्थिक फसवणूक ज्येष्ठ नागरिकांची केली जाते. या अशा प्रलोभनांना ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक संख्येने बळी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. याला कारणेही अनेक आहेत. पहिले म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर अशा शहरी भागांत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. त्यांची मुले, नातवंडे परदेशात स्थायिक झालेली आहेत. एकटेपणामुळे असे ज्येष्ठ नागरिक दुःखी, एकलकोंडी बनलेली आहेत. मानसिक स्वास्थ्य गमावून बसलेली आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या या मानसिकतेचा वापर करत ऑनलाइन फ्रॉड करणारे अशा ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या तथाकथित योजना सांगून मर्जीत घेतात आणि बँक खात्याची माहिती मिळवतात. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून पैसे लंपास करतात.
(हेही वाचा जनप्रबोधनानंतर डिजिटल क्रांती झाली असती, तर सायबर गुन्हे घडलेच नसते! काय म्हणतायेत सायबर तज्ज्ञ? )
लोकांमध्ये जनजागृती करणे हाच मुख्य पर्याय
अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे बँक व्यवहार ऑनलाइन कसे करतात याबद्दल अजिबात ज्ञान नसते. याचाही ऑनलाइन फ्रॉड करणारे फायदा घेतात. या नागरिकांकडून ओटीपी मिळवतात आणि त्यांची बँक खाती रिकामी करतात. त्यामुळे अशा प्रकारचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची बँक खाती ऑफलाइन सांभाळण्यासाठी कर्मचारी नेमावा. ऑनलाइन फ्रॉडला बळी पडण्यामागे प्रमुख मानसिकता ही अगतिकता असते. पैशाचे आकर्षण सर्वांनाच आणि सर्व वयोगटाला असते. या एकाच स्वभावगुणामुळे आपण हातोहात फसले जातो. तुम्हाला अचानक दुप्पट, तिप्पट रक्कम मिळणार, किंवा तुम्हाला बक्षीस म्हणून रक्कम देणार अथवा कमी गुंतवणुकीत भरपूर परतावा देणार, अशा स्वरूपाची प्रलोभने दिली जातात. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लोक या घोटाळ्यामध्ये अडकतात. अशा वेळी अशी ऑनलाइन फसवणूक थांबवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हाच मुख्य पर्याय आहे.
लेखक – डॉ. वृषाली राऊत, औद्योगिक/संघटनात्मक मानसोपचार तज्ज्ञ.
Join Our WhatsApp Community