तुम्हाला खरोखरच कर्जाची आवश्यकता असेल तर कृपया करून इन्स्टंट लोन अॅपच्या भूलथापांना बळी पडू नका. त्याऐवजी विविध आर्थिक संस्था, बँका आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते. जर बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया खूप किचकट वाटत असेल तर जुन्या पद्धतीने आपण आपले मित्रमंडळी, नातेवाईकांकडून तात्काळ पैसे उसने घेत असत, त्या पद्धतीने घेऊ शकता. परंतु इन्स्टंट लोन अॅपच्या विळख्यात पडू नका. कारण छोट्या रकमेसाठी अनेक पीडित या लोन अॅपच्या विळख्यात सापडून लाखो रुपये भरत आहेत. कोणतेही लोन अॅप तुम्ही डाऊनलोड करत असाल तर त्याचे रेटिंग तपासावे, त्या लोन अॅपचा पत्ता कोणता आहे, हेही पडताळावे. जर अशा अॅपचा भारतातील कोणत्याही भागाशी संबंध जुळत नसेल तर अशा अॅपपासून लांब राहिलेले बरे.
अशी होते फसवणूक
मुंबई शहरात सायबर क्राईमच्या मार्फत २९ गुन्ह्यांचा तपास चालू होता, त्यातील १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. ३५० पेक्षा जास्त बँक अकाऊंट सीझ केली आहेत. त्यामध्ये १४ कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. या व्यतिरिक्त आम्ही काही क्रिप्टो वॉलेटही सीझ केले आहेत. त्यामध्ये ७ कोटींपेक्षा जास्त रक्कम आहे. या तपासादरम्यान आम्हाला लक्षात आले आहे की, तात्काळ आणि सोप्या पद्धतीने लोन मिळते म्हणून लोन अॅपच्या विळख्यात लोक अडकत आहेत. या लोन अॅपच्या जाहिराती विविध सोशल माध्यमे, मोबाइलवरील एसएमएसद्वारे पीडितांपर्यंत पोहोचवल्या जात असतात. त्यामध्ये लिंक्स पाठवल्या जातात. तुम्ही जर अशा लिंक डाऊनलोड करत असाल, तर तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट, फोटो लायब्ररी आणि इतर सर्व प्रकारचा अॅक्सेस फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारापर्यंत जातो. त्यानंतर तो गुन्हेगार ५ ते १० हजारांपर्यंत कर्जाची रक्कम ठरवतो, हे कर्ज घेतल्यानंतर मात्र त्याबदल्यात मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचा प्रकार होतो. त्यामध्ये तुमच्या मोबाइलच्या फोटो गॅलरीचा अॅक्सेस फसवणूक करणारा गुन्हेगार घेतो, त्यातील फोटो मॉर्फिंग केले जातात. ते फोटो तुमचे नातेवाईक, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमच्या जवळच्या मित्रमंडळींना पाठवू, अशी धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. बऱ्याचदा असे लक्षात आले आहे की, गुन्हेगारांकडून कर्जाची रक्कम घेतलेली नसतानाही केवळ अॅप डाऊनलोड केल्यामुळे त्यातील फोटोंचा वापर करून संबंधितांचा छळ केला जात असल्याचे लक्षात आले आहे.
(हेही वाचा जनप्रबोधनानंतर डिजिटल क्रांती झाली असती, तर सायबर गुन्हे घडलेच नसते! काय म्हणतायेत सायबर तज्ज्ञ?)
पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न
लोन अॅपद्वारे व्याजदर कमी आकारले जात आहे आणि तात्काळ कर्ज मिळते, म्हणून अनेक जण त्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करतात, त्यावेळी तुमच्या परवानग्या मागितल्या जातात आणि तुम्ही त्यांना डोळे झाकून होकार देता. त्यामुळे तुमच्या मोबाइलचा जो काही डेटा असतो त्याचा अॅक्सेस फसवणूक करणाऱ्याला मिळतो. या अशा गुन्हेगारांमध्ये जामताडाशी संबंध दिसून आला नाही. मात्र सायबर गुन्ह्यामध्ये ज्या १४ आरोपींना नूकतेच अटक करण्यात आले. ते सगळे भारतीय असले तरी त्यांचे विविध देशांशी संपर्क आहेत. यात मोठे रॅकेट कार्यरत आहे, त्याची पाळेमुळे खोदण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यादृष्टीने आम्ही तपास करत आहोत.
लेखक – हेमराजसिंग राजपूत, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा.
Join Our WhatsApp Community