जनप्रबोधनानंतर डिजिटल क्रांती झाली असती, तर सायबर गुन्हे घडलेच नसते! काय म्हणतायेत सायबर तज्ज्ञ? 

94

जेव्हापासून कोरोना काळ सुरु झाला, तेव्हापासून ऑनलाइन लोन अॅपची संख्या वाढली. यातील अर्ध्याहून अधिक अॅप बेकायदेशीर आहेत. आता आरबीआयच्या काही मार्गदर्शक तत्वांमुळे हा प्रकार आटोक्यात आला आहे. मात्र अजूनही अवैधपणे चालणारे लोन अॅप सुरूच आहेत आणि त्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे. फसवणूक करणाऱ्या या टोळ्यांकडून संबंधितांच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करून त्रास दिला जातो. त्यांना तुमचे मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो पाठवू असे सांगत ब्लॅकमेलिंग केले जाते.

काय असते मोडस ऑपरेंडी?

इ शॉपिंग, ऑनलाइन बँकिंगमधून तुमची फसवणूक झाली तर तुम्ही पोलिसात तक्रार करता, मात्र पोलिस जो गुन्हेगार शोधतात तो चोर नसतोच. कारण तुमचे पैसे ज्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेले असतात तो खातेधारक मूळ गुन्हेगार नसतो. मुख्य चोर हा गँगचा मुख्य असतो, तो कुठेतरी बाहेर बसून असे फ्रॉड करत असतो आणि त्याचे लोक इथे काम करत असतात, जे मॉलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना हाताशी धरतात. किंवा असंघटित कामगार ज्यांचे बँकेत अकाऊंट आहे. अथवा जनधन खातेधारक आहे, अशा खातेधारकांच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले जातात. त्या बदल्यात संबंधित खातेधारकांना ५-६ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले जाते. अनेकदा अशा खातेधारकांचीही फसवणूक होते. म्हणून आर्थिक फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्यात अडचणी येतात. ज्याच्या खात्यात तुमच्या खात्यातील पैसे ट्रान्स्फर होतात, तो गुन्हेगार नसतोच, तो खातेधारक गरीब असतो. यातील मुख्य गुन्हेगार कुणालाच माहीत नसतो. त्यामुळे त्रास होतो. यात बँकाही हात वर करतात, कारण ग्राहकाने स्वतःहून फसवणूक करणाऱ्याला ओटीपी दिलेला असतो.

(हेही वाचा आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghChaddha ट्विटर ट्रेंड?)

प्रबोधनाशिवाय पर्याय नाही!

अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे जनप्रबोधन. हे जनप्रबोधन बँकेने, इ कॉमर्स कंपन्यांनी करणे गरजेचे असते. सर्वात महत्वाचे म्हणजे जनप्रबोधन हे सर्व भाषेत करणे गरजेचे आहे. कारण आता जनप्रबोधनाचे एसएमएस इंग्रजी भाषेतच येतात. त्यामुळे अन्य भाषेतही असे जनप्रबोधन करण्यात यावे. मराठी, हिंदी, गुजराती, तामीळ भाषेत जनप्रबोधन करावे. तेही सतत करणे गरजेचे आहे. जर जनप्रबोधन करून डिजिटल क्रांती झाली असती, तर असे फसवणुकीचे प्रकार कमी घडले असते.

कोणत्या उपाययोजना कराव्यात?

एखादी स्त्री तुम्हाला फोन करते ती तेव्हा नग्न होते आणि मग तुम्ही तिला पाहत आहात, असा तुमचा व्हिडिओ ती कॅप्चर करते आणि मग तो व्हिडिओ तुमच्या बायकोला पाठवेन, तुमच्या मुलाला पाठवेन, कुटुंबाला पाठवेन, इंस्टाग्राम, फेसबुकच्या तुमच्या सर्व मित्रांना पाठवेन, युट्युबवर अपलोड करेन अशा धमक्या देऊन तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न  करून ब्लॅकमेल केले जाते. त्यानंतर तुम्हाला सायबर क्राईममधून फोनही येतो. तो देखील खोटा असतो. त्यात तुम्हाला तुमची पोस्ट काढायची असेल तर अमूक एका अकाऊंटमध्ये पैसे पाठवावे, असेही सांगितले जाते. असा हा ब्लॅकमेलिंगचा धंदा जोरात सुरु आहे. काही ठिकाणी पोलिसांना हे लोक मिळाले आहेत. हे सर्व फसवणुकीतील गुन्हे हे सायबर गुन्ह्याखाली दाखल करता येतात. ब्लँकमेलिंग, खंडणी मागणे, फसवणूक करणे हे सगळे भादंवि अंतर्गत गुन्हे दाखल करता येतील. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ६६ (सी), ६६ (बी)  किंवा ६६ (इ) या अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. जर या गुन्ह्यातील गुन्हेगार मुंबईत पकडले, तर ते जामीन मिळाल्यावर अहमदाबादमध्ये जाऊन तोच गुन्हा करतात, तिथून जामीन मिळाल्यावर ते उत्तर भारतात जातात. अशा प्रकारे ते देशभरात जातात आणि नवनवीन नावाने फ्रॉडची रचना करतात. म्हणून मिनिस्ट्री ऑफ होम अफेर यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जनजागृती केली पाहिजे. त्यांनी अशा गुन्ह्याचा डेटाबेस करावा आणि तो देशभरातील ३६ राज्यांना पाठवून तो इंटरनेटवरून मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. तसेच मोबाइल कंपन्यांना ग्राहकांचा फोन नंबर दिला म्हणून जबाबदार धरावे, पोलीसांचे प्रशिक्षण देणे, अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना लगेच जामीन मिळणार नाही त्यानुसार प्रशिक्षण देणे अशा उपाययोजना करायला हव्यात.

(हेही वाचा पालघरमध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव उधळला; चार ख्रिस्त्यांना अटक)

अशी होते फसवणूक!

या आर्थिक फसवणुकीपासून वाचायचे असेल, तर कोणीतरी तुम्हाला काहीतरी खूप स्वस्त देते किंवा खूप व्याज देत आहे, इन्शुरन्स देत आहे, इन्कम टॅक्सचा रिफंड देत आहे, अशा प्रलोभनाला बळी पडू नका. देशात ज्या काही नवीन योजना येतात, त्याच्यासंबंधी हे लोक फ्रॉडची रचना करत असतात. त्याची भूल माणसांना पडते. माझ्याकडे ऑनलाइन फसवणूक झालेले असेही तक्रारदार आहेत, जे २०-२० वर्षांपासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलेले आहेत. त्यांनाही फसवलेले आहे. ही फसवणूक करण्यात आलेल्या पद्धतीला सोशल इंजिनिअरिंग म्हणतात. यात कोणीतरी तो किंवा ती तुम्हाला फोन करते, तुम्ही तिच्या गोड आवाजाला बळी पडता. मग तो किंवा ती तुम्हाला एसएमएस पाठवते, त्यामध्ये लिंक असते, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यावर एक सॉफ्टवेअर तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड होते. त्यानंतर तुमच्या मोबाइलचा संपूर्ण कंट्रोल त्या हॅकरकडे जातो. मग तो हॅकर तुमच्याकडे येणारा पिन क्रमांक किंवा ओटीपी घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करून टाकतो.

लेखक – विधिज्ञ, डॉ. प्रशांत माळी, सायबर कायदा व सायबर सुरक्षा तज्ज्ञ.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.