डार्कनेटची ‘काळा कांडी’: हे नक्की वाचा… नाहीतर तुम्हीही येऊ शकता गोत्यात

तेव्हा मग आपल्या डोळ्यासमोर फक्त अंधार पसरेल आणि या डार्कनेसचं कारण असेल "डार्कनेट"...

सध्या बरेचसे व्यवहार आपण एका क्लिकवर ऑनलाईन करत आहोत. त्यामुळे आपण स्वतःला खूप स्मार्ट समजतो. ही एका दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे. पण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, तशी गत आपली व्हायला नको, म्हणून आपण हे व्यवहार करताना काळजी घेणंही गरजेचं आहे. कारण आपण कितीही स्मार्ट असलो तरी आपल्यापेक्षा काही सुपरस्मार्ट लोक याचा गैरफायदा घेऊन, आपल्याला चांगला चूना लावू शकतात.

तेव्हा मग आपल्या डोळ्यासमोर फक्त अंधार पसरेल आणि या डार्कनेसचं कारण असेल “डार्कनेट”…

डार्कनेटची ‘काळी जादू’

अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायबर इंटेलिजन्स संस्था सायबलने दिलेल्या माहितीनुसार, 1 लाखांपेक्षा जास्त भारतीयांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्टच्या स्कॅन कॉपी डार्क वेबवर विक्रीसाठी आहेत. त्यामुळे आपली खाजगी माहिती जर डार्कनेटवरील सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली, तर त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात. यामध्ये आपल्या कागदपत्रांचा वापर करुन आपल्या नावाने घोटाळे करणे किंवा दुस-या देशासाठी आपल्या नावे हेरगिरी करणे, यांसारखे गंभीर गुन्हे सायबर गुन्हेगारांकडून केले जातात. इतकंच नाही तर आपल्या खाजगी माहितीच्या आधारे बॅंकेचे व्यवहार करुन आपली फसवणूक केली जाते आणि आपल्या माहितीच्या आधारे आपल्याला ब्लॅकमेल करुन धमकावण्याचे काम सुद्धा केले जाऊ शकते.

(हेही वाचाः सायबर गुन्हेगारांकडून साई भक्तांची लूट? ‘हे’ आहे श्री साईबाबा संस्थानाचे म्हणणे)

अशी गोळा केली जाते माहिती

Know Your Customer बाबत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. याद्वारे आपली कागदपत्रे ही स्कॅन केली जातात. आपल्या ग्राहकांची संपूर्ण माहिती आपल्याकडे असावी, यासाठी ही माहिती डेटाबेसवर साठवून ठेवली जाते. सायबल या संस्थेच्या म्हणण्यानुसार सायबर क्रिमिनल्स ही माहिती डेटाबेसवरुन चोरुन, त्याचा वापर करतात आणि यामध्ये जास्त वृद्धांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे पैशांच्या व्यवहारांसाठी कुठलीही खाजगी माहिती(आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर) फोन, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे कोणीही आपल्याकडे मागत असल्यास ती त्या व्यक्तीला कधीही सांगू नये.

(हेही वाचाः फेसबूक अकाऊंट हॅक झाल्यावर काय कराल? ‘या’ स्टेप्स करा फॉलो)

डार्कनेट म्हणजे काय?

डार्कनेटवरुन कोणतीही माहिती मिळवणे वाटते तितके सोपे नाही. आपण रोज इंटरनेटद्वारे जे वेबपेज ब्राऊझिंग करतो त्याला सरफेस वेब(Surface Web) म्हणतात. आता या नावावरुनच आपल्या लक्षात येईल की, इंटरनेटवरील आपला रोजचा वापर हा मर्यादित आहे. तो सरफेस(पृष्ठभागा)च्या पलीकडे जात नाही. पण त्या पलीकडे असलेले ठिकाण म्हणजेच डार्कनेट. डार्कनेट ज्या पद्धतीने तयार केले आहे, त्यामुळे त्यावरील माहिती युजर्सला मिळणे खूप कठीण असते. डार्कनेटवर प्रवेश करण्यासाठी एका विशिष्ट सॉफ्टवेअरची गरज असते ज्यामध्ये ब्राऊझरद्वारे डार्कनेटवर प्रवेश करता येतो.

(हेही वाचाः मुंबईत कुठे उभारणार सायबर पोलीस ठाणी…वाचा सविस्तर वृत्त )

डार्कनेट म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा

डार्कनेट ही वेबसाईट सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या बॅन करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये सहज प्रवेश करता येतो. डार्कनेट ही आंतरराष्ट्रीय वेबसाईट असून, ती देशासाठी घातक अशी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर होणारे व्यवहार क्रिप्टो करन्सी मार्फत होत असतात. सुरक्षा यंत्रणा देखील या व्यवहाराबाबत गाफील असून, कुठून कुठे हे व्यवहार होतात याची पुरेशी माहिती सुरक्षा यंत्रणेकडे नाही. ही माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे या वेबसाईटचा वापर गुन्हेगार, ड्रग्स माफिया, अतिरेकी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात होत असतो. डार्कनेट वरुन राज्यात अनेक घटना देखील घडल्या आहेत, या वेबसाईटच्या माध्यमातून तरुणांना चुकीचे धडे दिले जात असल्याचे देखील उघडकीस आले आहे.

डार्कनेटद्वारे होतो ड्रग्सचा व्यवहार

अलीकडे एनसीबीच्या चौकशीत एलएसडी,अमेरिकन भांग, गांजा आदी अंमली पदार्थ डार्कनेटमधून खरेदी करण्यात आले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून विशेष सॉफ्टवेअरद्वारे डार्कनेट वेबसाइट्समध्ये प्रथम प्रवेश केला जातो. त्यानंतर, केवळ डार्कनेटद्वारे योग्य प्रवेश असलेल्या विविध वेबसाइट्सवर प्रवेश केला जाऊ शकतो. या साइट्समध्ये विविध विक्रेते आहेत, जे विविध औषधे विक्रीमध्ये तज्ज्ञ आहेत. यापैकी कोणीही विक्रेते त्यांची खरी ओळख उघड करत नाहीत. ज्या व्यक्तीस ड्रग्स खरेदी करण्याची इच्छा असते त्याने अज्ञात मेसेंजर सेवांचा वापर करुन, ग्राहकांना ड्रग्स विक्रेत्यांशी संपर्क साधून ड्रग्सच्या किमतीची विचारपूस करण्यास सांगण्यात येते. एकदा का ग्राहकाने उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ड्रग्सच्या वितरणासाठी पत्ता पाहिला जातो. हे सर्व व्यवहार बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करन्सीद्वारे व्यवहार पूर्ण केले जातात.

(हेही वाचाः ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

(हेही वाचाः सायबर गुन्ह्यांचे विदेशी कनेक्शन )

सावध राहा

डार्कनेटच्या माध्यमातून साबयर गुन्हेगारांना बेकायदेशीर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला जातो. त्यामुळे आपल्या नावे कोणी चुकीचे काम करुन आपल्याला गोत्यात आणू नये, असे जर तुम्हाला वाटत असेल तर वेळीच सावध राहा. आपला डेटा हा कायम सुरक्षित(encrypted) ठेवा आणि कोणत्याही डिव्हाईसद्वारे आपली माहिती शेअर करताना सावधानता बाळगा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here