कालपर्यंत शेअर बाजार म्हटले की, तो आपला प्रांत नाही, आपल्याला काही समजत नाही, उगाच नुकसान का करून घ्यायचे, अशा अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळायच्या, त्यामुळे सहसा सर्वसाधारण व्यक्ती कधी याच्या फांदात पडत नसे, पण आता परिस्थिती बदलली आहे. ट्रेन, बस, कार्यालयात शिळोप्याच्या गप्पांप्रमाणे ‘आज मार्केट काय म्हणते’, ‘कोणते शेअर वाढले आहेत’, ‘आज शेअर घ्यायचे का’, अशा चर्चा ऐकू येऊ लागल्या आहेत. मात्र यात एक शब्द मोठ्या प्रमाणात कानी पडू लागला आहे, तो म्हणजे ‘आयपीओ’. त्यामुळे हा आयपीओ म्हणजे आहे तरी काय, हे समजून घेऊया
बर्याच जणांना गुंतवणूक म्हणजे बँकमधील बचत, विमा पॉलिसी इतकेच माहीत असते, पण शेअर मार्केट, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड, आयपीओ, एसआयपी इत्यादीविषयी फारसे ज्ञान नसते, त्यातच आताच्या काळात कुणी नवशिक्या या क्षेत्रात डोकाऊ लागताच त्याला आधी आयपीओ शब्दाचा परिचय होऊ लागतो. विशेष म्हणजे जेव्हापासून पंतप्रधानांनी स्टार्ट अप योजना सुरू केली आहे, मेक इन इंडीया संकल्पना मांडली आहे, तेव्हापासून तर हा शब्द अधिक अधोरेखित झाला आहे.
आयपीओ म्हणजे काय?
आयपीओ म्हणजे इनिशीअल पब्लिक ऑफरिंग अर्थात एखादी खासगी कंपनी सामान्य लोकांना तिचे समभाग म्हणजे शेअर्स ऑफर करून कंपनी तिची मालकी सार्वजनिक करते. जेव्हा एखादी कंपनी तिचे शेअर्स पहिल्यांदा जनतेला ऑफर करते, तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात. या प्रक्रियेत, कंपन्या त्यांचे शेअर्स सामान्य जनतेला देतात. आयपीओच्या माध्यमातून कंपनी निधी गोळा करते आणि कंपनीच्या वाढीसाठी तो निधी खर्च करते. त्या बदल्यात, जे लोक आयपीओ विकत घेतात त्यांना कंपनीमध्ये हिस्सा मिळतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या खरेदी केलेल्या भागाचे मालक असतात.
(हेही वाचा सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र)
कंपन्या शेअर्स बाजारात का आणतात?
भांडवल उभारण्यासाठी – एखादी नवीन कंपनी आपले शेअर्स आयपीओद्वारे जनतेला देते, तेव्हा कंपनीला भरपूर पैसे मिळतात, ज्याचा वापर कंपनी स्वतः च्या वाढीसाठी करू शकते.
प्रतिष्ठेसाठी – जेव्हा एखादी कंपनी आपला आयपीओ बाजारात आणते, तेव्हा ती तिची प्रतिष्ठा देखील वाढवते. सूचीबद्ध कंपन्या अधिक चांगल्या मानल्या जातात आणि त्यांची बाजारातील प्रतिष्ठाही चांगली आहे.
आयपीओसाठी सेबीची भूमिका काय?
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांसाठी सरकारी नियामक मंडळ आहे. हे आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडते. सेबीला सर्व प्रकारची माहिती देणे कंपन्यांना बंधनकारक आहे. ही एक प्रकारची अनिवार्य अट आहे की कंपनी आपली सर्व माहिती सेबीला देईल. एवढेच नाही तर आयपीओ आणल्यानंतर सेबी कंपनीची चौकशी देखील करते, कंपनीने दिलेली माहिती योग्य आहे की नाही, त्या कंपनीची वार्षिक उलाढाल, तिचा लेखाजोखा, कंपनीचा उद्देश इत्यादी सगळे तपासल्यावरच सेबी संबंधित कंपनीला बाजारात येण्यासाठी परवानगी देते.
आयपीओमध्ये गुंतवणूक कशी करावी?
आयपीओमध्ये गुंतवणूक ही एक धोकादायक गुंतवणूक मानली जाते, कारण त्यात कंपनीच्या शेअर्सच्या प्रगतीशी संबंधित कोणताही डेटा किंवा माहिती नसते, तरीही ज्या व्यक्तीने पहिल्यांदा शेअर बाजारात गुंतवणूक केली, तिच्यासाठी आयपीओ हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात भविष्य घडवायचे असेल, तर तुम्हाला आयपीओबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आयपीओ जारी करणारी कंपनी आपला आयपीओ गुंतवणूकदारांसाठी ३ ते १० दिवसांसाठी उघडते. म्हणजे जेव्हा कोणताही आयपीओ येतो, तेव्हा कोणताही गुंतवणूकदार ३ ते १० दिवसांच्या आत तो खरेदी करू शकतो. एखादी कंपनी आपला आयपीओ जारी करण्याचा कालावधी फक्त ३ दिवस ठेवते, तर कोणीतरी ती तीन दिवसांपेक्षा जास्त ठेवते.
कशी खबरदारी घ्याल?
- कंपनीच्या साइटला भेट देऊन किंवा नोंदणीकृत ब्रोकरेजद्वारे तुम्ही या दिवसांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता.
- आयपीओमध्ये गुंतवणूक करताना जेव्हा तुम्ही कंपनी निवडतात, तेव्हा सर्वप्रथम तुमचे ब्रोकर सर्वोत्तम असावेत.
- ब्रोकरसह कंपनी निवडण्याचा प्रयत्न करा. आपण निवडत असलेल्या कंपनीशी इतर तीन किंवा चार कंपन्यांची तुलना करा.
- या सर्व कंपन्यांची काही दिवसांची प्रगती पाहूनच गुंतवणूक करा.
- रेटिंग एजन्सीचे मत देखील खूप महत्त्वाचे आहे. कंपनीच्या आयपीओची किंमत देखील पहा, बाजारात कंपनीच्या प्रवर्तकांची विश्वासार्हता पहा आणि इतर गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या आयपीओबद्दल माहिती मिळवत रहा.
(हेही वाचा उच्च शिक्षित तरीही १ हजार कामगारांच्या हाती झाडूच!)
आयपीओचे फायदे आणि तोटे?
फायदे – आयपीओ द्वारे सूचना दिली जाते की, कंपनी चांगली कामगिरी करत आहे आणि कंपनी निधी उभारून आणखी नवीन प्रकल्पांवर काम करणार आहे आणि त्याला आपला व्यवसाय वाढवायचा आहे. विविध प्रकारच्या Merger and Acquisitions देयके शेअर्सच्या मदतीने केली जाऊ शकतात, जी रोख व्यवहारातून मुक्त होतात. आयपीओच्या मदतीने कोणतीही कंपनी चांगल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकते आणि आयपीओ दरम्यान कर्मचाऱ्यांना शेअर्स ऑफर करून, कंपनी कमी पगारावर नवीन लोकांनाही नियुक्त करू शकते. जेव्हा शेअर्सची किंमत वाढते, प्रमोटर कंपनीमध्ये शेअर्स असल्यास प्रमोटरची निव्वळ किंमत देखील वाढते. यामुळे प्रमोटरला त्याच्या मेहनतीचे फळ मिळते.
तोटे – आयपीओची प्रक्रिया एखाद्या कंपनीसाठी खूप महाग असते. कंपनीचे लीडर्स आयपीओकडे अधिक लक्ष देतात, ज्यामुळे कंपनीच्या नियमित कामात फरक पडू शकतो. गुंतवणूक बँका त्यांच्या सेवा पुरवण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारतात. आयपीओ लाँच झाल्यावर कंपनीचे मालक ताबडतोब त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत. कारण असे केल्याने कंपनीच्या शेअर्सच्या किमती कमी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवसायाचे नियंत्रण संचालक मंडळाकडे जाते आणि कंपनीचा मालक त्याचा भाग असू शकतो किंवा नसतो. संचालक मंडळाकडे इतकी शक्ती आहे की, ते कंपनीच्या मालकाला कंपनीतून काढून टाकू शकतात. कंपनीला सेबीच्या नियमांनुसार काम करावे लागते. जनतेला कंपनीबद्दल बरेच काही कळते. जेव्हा जेव्हा एखाद्या कंपनीचा आयपीओ येतो तेव्हा लोकांमध्ये त्या कंपनीबद्दल प्रचंड उत्साह असतो, कारण गुंतवणूकदारांना वाटते की कमी कालावधीत नफा मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, परंतु काहीवेळा गुंतवणूकदारांना त्यांचे पैसेही गमवावे लागतात आणि नुकसान होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार असाल, तर आधी त्याबद्दल चांगले संशोधन करा आणि जर कंपनीचे बिझनेस मॉडेल खरोखर चांगले असेल आणि तुम्हाला वाटत आहे की कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकते, तर फक्त यात तुम्ही त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे.
नुकतेच आलेले आयपीओ
एलआयसी, बजाज एनर्जी, कल्याण ज्वेलर्स, पॉलिसी बाजार, झोमॅटो, बार्बेक्यू नेशन, डिलिव्हरी, पेटीएम, ओला आणि बायजूस
भविष्यात येणारे आयपीओ
- मेडप्लस हेल्थ सर्व्हीसेस – १,६३८ कोटी रुपये भांडवल उभारण्याचे ध्येय
- पूर्णिक बिल्डर्स – ५१९ कोटी भांडवल उभारण्याचे ध्येय
- रेटगेन ट्रॅव्हल्स टेक्नॉलॉजी – ४०० कोटी भांडवल उभारण्याचे ध्येय
- ट्रॅक्सन टेक्नॉलॉजी – ४०० कोटी भांडवल उभारण्याचे ध्येय