गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने देशभरातील नागरिकांना हैराण केले होते. सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना भारतात एका नव्या फ्लूने डोकं वर काढलं आहे. ही चिंता वाढवणारी बातमी केरळमधून समोर आली असून राज्यातील अनेक भागात या आजाराची प्रकरणे आढळली आहे. या नव्या फ्लूचे नाव टोमॅटो फ्लू असे असून या विषाणूजन्य आजाराने मोठ्या संख्येत लहान मुलांना ग्रासले आहेत. या आजाराने बाधित होणाऱ्या मुलांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मोठा समावेश असल्याची माहिती मिळतेय.
८० हून अधिक मुले टोमॅटो फ्लूने बाधित
केरळमध्ये ८० हून अधिक मुले टोमॅटो फ्लूने बाधित झाल्याने पालकांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. केरळच्या जिल्ह्यांपैकी टोमॅटो फ्लू रोखण्यासाठी, वैद्यकीय पथक तामिळनाडू-केरळ सीमेवर दाखल झाले असल्याचे सांगितले जात आहे. केरळ येथील मुलांमधील ताप, पुरळ आणि इतर समस्या असणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय आणखी २४ सदस्यीय पथक तयार करण्यात आले असून, ते अंगणवाड्यांमधील पाच वर्षांखालील मुलांची तपासणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हा टोमॅटो फ्लू म्हणजे नेमके काय? आणि त्याचे लक्षणं नेमकी कोणती? हे जाणून घ्या…
टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो केरळमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. या फ्लूची बाधा झाल्यानंतर मुलांच्या अंगावर पुरळ आणि फोड येतात. या खुणा सामान्यतः लाल रंगाच्या असतात, त्यामुळे याला ‘टोमॅटो फ्लू’ किंवा ‘टोमॅटो फिव्हर’ असे म्हटले जात आहे. दरम्यान, केरळच्या छोट्या भागांमध्ये या आजाराची प्रकरणे आढळून आली आहे. तसेच यावर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाही तर, हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो अशी चेतावणी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काय आहेत लक्षणं?
- या फ्लूच्या लक्षणांमध्ये लाल पुरळ, फोड ज्याचा रंग लाल असतो. त्यामुळे त्वचेची जळजळ आणि शरीरावर निर्जलीकरण यांचा समावेश होतो.
- अति ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे व नाक वाहणे, हाताचा रंग बदलणे ही लक्षणे संसर्ग झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात.