फेसबूक अकाऊंट हॅक झाल्यावर काय कराल? ‘या’ स्टेप्स करा फॉलो

सध्या बऱ्याच व्यक्तींचे फेक फेसबूक अकाऊंट बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे. जर कोणाचे फेक फेसबूक अकाऊंट बनवण्यात आले तर काय करायचे? 

87

सायबर हॅकर कडून अनेकांचे सोशल मीडिया खाते हॅक झाल्याच्या बातम्या वृत्तांकन करत असल्यामुळे, मी कुठल्याही अडचणीत अडकू नये म्हणून सोशल मीडिया असो, अथवा नेटबँकिंग किंवा ऑनलाइन पेमेंट बाबतचे अॅप असो, मी खूप काळजी घेऊन आतापर्यंत ते हाताळत होतो. त्यामुळे मी कधीही या सायबर हॅकर अथवा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणार नाही असा मला स्वतःवर कॉन्फिडन्स होता. मात्र हा कॉन्फिडन्स काही दिवसांपूर्वी गळून पडला.

काय झाले नेमके?

सायबर हॅकरने मला देखील छोटासा हिसका दाखवला. माझे फेसबूक खाते हॅक करुन हॅकरने माझ्या अनेक फेसबूक मित्र, नातेवाईक यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अनेकांनी माझ्या नावाने आलेली रिक्वेस्ट स्विकारली. या हॅकरने त्यांना मेसेज करुन ‘मी हॉस्पिटलमध्ये आहे, मला पैशांची गरज आहे. मला गुगल पे करा’ असे विविध प्रकारे मेसेज मेसेंजर वरुन पाठवले. मात्र फेसबूक वरील माझे मित्र दररोज माझ्या संपर्कात असल्यामुळे, त्यांनी थेट मला फोन करुन विचारले, त्यावेळी माझ्या लक्षात आले की माझे फेसबूक हॅक झाले आणि माझा हा (सो कॉल्ड) कॉन्फिडन्स गळून पडला.

(हेही वाचाः सायबर गुन्हेगारांकडून साई भक्तांची लूट? ‘हे’ आहे श्री साईबाबा संस्थानाचे म्हणणे)

सोडला सुटकेचा निश्वास

काय करावे सुचत नव्हते. सुरुवातीला मी फेसबूकवर माझे अकाऊंट हॅक झाले आहे, अशी पोस्ट केली. त्यानंतर ती पोस्ट माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली. मी पत्रकार असल्यामुळे त्यात गुन्ह्यांसंदर्भात वृत्तांकन करत असल्यामुळे माझा पोलिस अधिकारी यांच्याशी रोजचा संपर्क होता. सायबर गुन्हे शाखेत काम करणा-या एका पोलिस अधिकारी यांनी माझे व्हॉट्सअप स्टेटस बघताच मला व्हॉट्सअप वर एक भला मोठा मेसेज करुन, हा मेसेज फॉलो करा, असे सांगितले. मी तातडीने त्या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे मित्राच्या फेसबूक वर जाऊन मेसेज फॉलो केला आणि काही वेळातच हॅकरने उघडलेले माझे बनावट फेसबूक खाते कायमचे बंद झाले. तेव्हा कुठे मी सुटकेचा निश्वास सोडला.

तुमचे फेसबूक हॅक झाले किंवा तुमचे बोगस फेसबूक खाते बनवल्यावर तुम्ही देखील सायबर पोलिसांकडून आलेल्या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे केले, तर तुम्ही देखील या हॅकरच्या जाळ्यातून बाहेर पडू शकता. तुम्ही मित्र नातेवाईकांना देखील सायबर हॅकर पासून वाचवू शकता.

(हेही वाचाः ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

फेसबूक हॅक झाल्यावर करायचे काय ?

सध्या बऱ्याच व्यक्तींचे फेक फेसबूक अकाऊंट बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे. जर कोणाचे फेक फेसबूक अकाऊंट बनवण्यात आले तर काय करायचे?

  1. प्रथमतः ज्यांची फेसबूक प्रोफाईल फेक बनवली आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबूक अकाऊंटवरुन बनवलेली  फेक प्रोफाईल शोधा.
  2. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाइलची फेसबूक लिंक मागवून घ्या.
  3. त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्या डॉट वर क्लिक करा.
  4. तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  5. Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  6. पुढे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity.
  7. आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा.
  8. फेक प्रोफाईल अकाऊंट काही वेळाने बंद होईल.
  9. इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना, आपल्याला आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्ट वरील अकाउंटवर जाऊन वरीलप्रमाणेच इंस्ट्रक्शन्स फॉलो करुन, तिथे फक्त Me ऐवजी A Friend ऑप्शन सिलेक्ट करा.
  10. नेक्स्ट केल्यानंतर नाव टाईप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बॉक्स येईल, त्या बॉक्समध्ये तुमच्या ज्या मित्राची फेक फेसबूक प्रोफाईल बनवली आहे, त्याचं नाव तिथे टाईप करा.
  11. तिथे तुमच्या मित्राची ओरिजिनल फेसबूक प्रोफाईल येईल, तिला सिलेक्ट करा.
  12. रिपोर्ट सेंड करा, फेक प्रोफाईल काही वेळाने बंद होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.