हुतात्मा चौक की हुतात्मा स्मारक चौक! सत्ताधारी सेनेचं लक्ष कुठे?

शिवाजी पार्कचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे करण्यात आले. परंतु तब्बल पाच वर्षांपूर्वी फोर्ट येथील हुतात्मा चौकाचे नाव हुतात्मा स्मारक चौक असे सुधारित करण्याचा महापालिकेत ठराव मंजूर झाला. मात्र असे असतानाही अद्यापही या सुधारित नावाच्या पाट्या हुतात्मा स्मारक चौकात तसेच कागदोपत्री दस्तऐवजात झालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे लक्ष कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हुतात्मा चौक परिसरात १४ जणांच्या प्राणाची आहुती

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात २१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाऊंटन म्हणजेच आताचे हुतात्मा चौक परिसरात प्रथम १४ जणांनी प्राणाची आहुती दिली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढा पेटता राहिला. १६ जानेवारी ते ३ जून १९५६ पर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात ९३ हुतात्मे झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एकूण १०७ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जेथे प्रथम रक्त सांडले, त्या जागी २१ नोव्हेंबर १९६१ साली ‘हुतात्मा स्मारक’ उभारण्यात आले. हे ‘हुतात्मा स्मारक’ महाराष्ट्राची अस्मिता, शिवाय संयुक्त महाराष्ट्र लढयाचा इतिहास जागविणारे प्रेरणास्थान आहे.

हुतात्मा स्मारक चौक असे नामकरण करण्याची मागणी

‘हुतात्मा स्मारक’ उभारल्यानंतर फ्लोरा फाऊंटनच्या या चौकाला हुतात्मा चौक नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने २९ एप्रिल १९६३ रोजी मंजूर केला. हुतात्मा चौक नावाचा वापर सुरु झाला. परंतु मुंबई संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांची स्मृती जागविणारे हुतात्मा स्मारक आहे. त्यामुळे हुतात्मा चौक ऐवजी हुतात्मा स्मारक चौक असे पुन्हा नामकरण करण्याची मागणी तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर, तत्कालीन सभागृह नेत्या आदींकडे संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी केली होती. त्यानंतर भाऊ सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी महापालिकेचा प्रस्ताव रेओपन करत महापालिका सभागृहात प्रस्ताव मांडला. या सुचनेनुसार मुंबई महापालिका सभागृहात ८ मे २०१७ रोजी सुधारित ठराव मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्राय करता पाठवण्यात आला. याला आता साडेचार वर्षे झाली आहेत.

(हेही वाचा – हुतात्मा स्मारकाची साठ वर्षे पूर्ण! काय आहे इतिहास?)

हुतात्मा स्मारकाच्या उभारणीला येत्या २१ नोव्हेंबर २०२१ ला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या हिरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना या हुतात्मा चौकाचे नामकरण हुतात्मा स्मारक चौक असे करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत मंजूर ठरावाची अंमलबजावणी करावी अशी विनंती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here