मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या एका महिलेकडून मुंबईत कोरोनाच्या एक्सई या विषाणूने प्रवेश केल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यानंतर राज्यपासून ते केंद्रापर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली. ही महिला गेल्या महिन्यात कोरोनाबाधित असल्याचे पालिकेने जाहीर केल्याने या 50 वर्षीय महिलेच्या आताच्या ठिकाणावरूनही बराच गोंधळ उडाला. ही महिला अद्याप मुंबईतच असल्याचा अखेर उलगडा झाला आहे.
( हेही वाचा : आता मिळवा मोफत आरोग्य सेवा! कशी ते वाचा… )
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती
एक्सई विषाणूबाधित असलेल्या या महिलेची संपूर्ण माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याला बुधवार सायंकाळपर्यंत नव्हती. लसीचे दोन डोस घेतलेल्या या महिलेच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. ही महिला व्यवसायाने फॅशन डिझाईनर असून ती क्रू मेंबरही आहे. या महिलेला कोरोनाची गेल्या महिन्यात बाधा झाल्यानंतर तिला ताज लॅण्ड हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवले गेले, दुसऱ्या दिवशी तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. एवढीच माहिती गुरुवारपर्यंत पालिकेने दिली. ही महिला अजूनही मुंबईत आहे का, याचे उत्तर पालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्यांकडे नव्हते. गुरुवारी दुपारी चौकशीनंतर ही महिला अजूनही मुंबई दर्शनातच मशगूल असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तिची आता कोणतीच तपासणी केली जाणार नाही असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community