आयुक्त नक्की कोणाला घाबरतात? कोरोनाला की नगरसेवकांना?

आयुक्तांना नक्की भीती कोणाची? नगरसेवकांची की कोरोनाची, असा प्रश्न आता प्रत्येक नगरसेवकांना पडू लागला आहे.

92

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे नगरसेवकांना भेट देत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ना ते नगरसेवकांना भेटतात ना गटनेत्यांच्या सभेला उपस्थित राहतात. त्यामुळे आयुक्त नक्की कुणाला घाबरतात? नगरसेवकांना की त्यांच्यापासून होणाऱ्या कोरोनाला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सर्वांपासूनच अंतर राखून

मुंबईत कोरोनाचा आजार नियंत्रणात आणल्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे कौतुक केले जात असले तरी, कोरोना काळापासून त्यांनी सर्वांपासूनच अंतर राखण्याचे धोरण स्वीकारले आहे. यापूर्वीचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी हे कार्यालयात बसून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे कारभार हाकत असल्याने त्यांना बदलून सरकारने इक्बालसिंह चहल यांची वर्णी लावली. पम कोविडच्या नावाखाली ते सर्वांच्याच भेटी नाकारत आहेत.

गटनेत्यांचा गटही नाराज

मुंबई महापालिकेत धोरणात्मक बाबींचे निर्णय घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची सभा आयोजित केली जाते. पण कोरोना सुरू झाल्यापासून ही गटनेत्यांची सभा झालेली नसून, शुक्रवारी आयोजित केलेली सभाही रद्द करण्यात आली. गटनेत्यांच्या सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास आयुक्तांनी नकार दिला असून, आपण व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित राहू, असे त्यांनी महापौरांना कळवले आहे. पण गटनेत्यांची सभा ही नेमक्याच सदस्यांसोबत असल्याने सुरक्षित अंतर राखून याचे आयोजन करता येण्यासारखे असतानाही, आयुक्त या सभेला उपस्थित राहू शकत नाहीत. खुद्द सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीच्या बैठकीत गटनेत्यांच्या सभेला आयुक्त उपस्थित राहण्यास तयार नसल्याचे सांगितले होते.

(हेही वाचाः भायखळा प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे! – केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या उप महानिरीक्षक)

५० पावलांवर सभागृह पण तरीही…

गटनेत्यांच्या सभेबरोबरच आयुक्त अध्यक्ष असलेल्या वृक्ष प्राधिकरणाची सभा मागील २ डिसेंबर २०२० पासून झालेली नाही. वृक्ष प्राधिकरणाची सभा २१ दिवसांनी होणे बंधनकारक आहे. पण आयुक्तांनी कोरोनाच्या नावाखाली या सभा न घेता नियमांचे उल्लंघन केले आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पावर महापालिका सभागृहात शुक्रवारी मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पाच्या महसुली खर्चाला मान्यता देण्यापूर्वी नगरसेवकांच्या चर्चेला आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संबोधित केले. आयुक्तांचे दालन आणि महापौर, सभागृहनेत्या या ज्या सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरसमध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यापासून अवघ्या ५० पावलांवर हे सभागृह आहे. पण आयुक्तांनी त्या सभागृहातून नगरसेवकांना संबोधित न करता आपल्या दालनातूनच संबोधित केले.

भीती कोणाची?

एका बाजूला आयुक्त राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ वा अन्य व्यावसायिकांना आपल्या कार्यालयात तसेच सभागृहात प्रत्यक्ष भेटत आहेत. पण दुसरीकडे नगरसेवकांचा सहभाग असलेल्या ठिकाणी जाणे ते टाळत आहेत. त्यामुळे आयुक्तांना नक्की भीती कोणाची? नगरसेवकांची की कोरोनाची, असा प्रश्न आता प्रत्येक नगरसेवकांना पडू लागला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.