कोण आहे वाझेंच्या मागे असलेला ‘बडा’ व्यक्ती?

या सर्वामागे कोणीतरी बडी व्यक्ती असावी असा संशय असून, सचिन वाझे नक्की कोणाला पाठीशी घालत आहेत, असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे.

171

एकेकाळी गुन्हेगारांना बोलतं करणारे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना बोलतं करण्यासाठी, एनआयएच्या अधिकाऱ्यांना एकप्रकारची कसरत करावी लागत आहे. चौकशीत काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे याचा दांडगा अनुभव असणारे वाझे यांनी एनआयआयला दिलेल्या कबुलीवर एनआयएच्या अधिकाऱ्यांचा विश्वासच बसत नाही. कोणाचेही नाव न घेता पुन्हा एकदा स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी हा बनाव केल्याचे वाझे यांनी एनआयएला सांगितले आहे. मात्र वाझे हे कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेऊ, असा विश्वास एनआयएच्या अधिका-यांनी दाखवला आहे. या सर्वामागे कोणीतरी बडी व्यक्ती असावी असा संशय असून, सचिन वाझे नक्की कोणाला पाठीशी घालत आहेत, असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे.

बडी व्यक्तीही सहभागी?

मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचा कट सचिन वाझे यांनी रचला होता, हे एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. या कटात एकट्या सचिन वाझे यांचा हात असूच शकत नाही, त्यांच्या पाठीशी कोणीतरी बडी व्यक्ती असण्याची शक्यता एनआयएच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र ती बडी व्यक्ती कोण आहे, त्याचा प्रकरणाशी काय संबंध आहे याबाबत अद्याप काहीही उघड झालेले नाही. सचिन वाझे यांना या कटात मदत करणारे सीआययूच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार देखील एनआयएच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून, त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. पुन्हा स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे कृत्य असे जरी सचिन वाझे म्हणत असले, तरी या त्याच्या जबाबात किती तथ्य आहे हे तपासले जाईल, असे एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी! हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त! )

काय होते मर्सिडीज मध्ये?

वाझे यांच्या चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली असल्याचे एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी मंगळवारी स्पष्ट केली आहे. ती म्हणजे एनआयएने ताब्यात घेतलेली मर्सिडीज बेन्झ ही महागडी मोटार सचिन वाझे हेच वापरत होते व त्या मोटारीत अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि रोकड एनआयएच्या हाती लागल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या मर्सिडीज बेन्झ या मोटारीतून पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, नोटा मोजण्याचे मशीन, स्कॉर्पिओ गाडीच्या दोन नंबर प्लेट, कपडे आणि केरोसीनची बॉटल सापडली असल्याचे शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

पीपीई किटचे रहस्य काय?

या सर्व वस्तू आणि रोकड एनआयएने जप्त केली असून, या वस्तूंमध्ये सापडलेल्या कपड्यांत एक चौकट्यांचा शर्ट देखील आहे, तसाच शर्ट पीपीई किट घालून अंबानींच्या घराजवळ फिरणाऱ्या व्यक्तीच्या अंगात होता. तसेच एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीपीई किट घालून फिरणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सचिन वाझेच असल्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मर्सिडीज या मोटारीत असलेल्या केरोसीनच्या बॉटल मधील केरोसीन हे पीपीई किट जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे, एनआयएच्या सूत्रांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘त्या’ इनोव्हा मोटारीतील दोघांची ओळख पटली, अटकेची शक्यता! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.