४ अब्ज डॉलर्सचा गंडा घालून ‘तिने’ अवघ्या जगाला फसवले!

153

आभासी चलन जगतामध्ये तब्बल ४ अब्ज डॉलर्सचा घोटाळा करणा-या महिलेचा आज जगभरात शोध सुरु आहे. तिचा FBIच्या टॉप टेन मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत अनेक नामचीन खुनी, दरोडेखोर, गँगस्टर्स यांचा समावेश आहे. जो कुणी या महिलेची माहिती देईल, त्याला १ लाख डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

‘क्रिप्टोक्विन’ रुजा इग्नाटोवा?

बल्गेरियनमध्ये जन्मलेल्या रुजा इग्नाटोवाने 2014 मध्ये स्वतःचे OneCoin या आभासी चलनाची स्थापना केली. दोन वर्षात, त्याचे जगभरात 3 दशलक्ष सदस्य झाले. इग्नाटोवा हिने कथित खोटी स्वप्ने दाखवून उत्तम परतावा मिळेल अशी आमिषे दाखवून जगभरातील गुंतवणूकदारांवर भुरळ पाडली. त्यामुळे काही काळातच OneCoin आभासी चलन जगभरात प्रसिद्ध झाले. अमेरिकेसह अनेक देशांतील पोलीस या महिलेच्या मागावर आहेत, पण आतापर्यंत तरी तिने सगळ्यांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. ‘क्रिप्टोक्विन’ म्हणून ती प्रसिद्ध आहे.

(हेही वाचा Patra Chawl Case: संजय राऊतांची पत्नी वर्षा यांना ED चे समन्स)

२०१७पासून रुजा गायब 

गेल्या काही वर्षांपूर्वी क्रिप्टोकरन्सीने जेव्हा लोकांना अक्षरश: वेड लावले होते, त्यावेळी वाहत्या पाण्याची दिशा लक्षात घेऊन रुजानेही OneCoin नावाचे आपले एक आभासी चलन सुरू केले. बिटकॉइनपेक्षा हे चलन अधिक ‘चलनी’ असल्याचे सांगत आणि बक्कळ पैसा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने लोकांवर माेहिनी टाकायला सुरुवात केली. आपल्या आभासी चलनाचा जोरदार प्रचार तिने सुरू केला. लोक तिच्या या मोहजालात फसले. जास्त पैसे मिळविण्याच्या मोहात आपल्याकडची असेल नसेल ती पुंजी लोकांनी रुजाकडे गुंतवली. लोकांचा ‘वनकॉइन’वरचा विश्वास आणखी वाढला आणि आपल्या खिशातले राहिलेले पैसेही लोकांनी तिला पटापट काढून दिले. थोड्याच दिवसांत लोकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आपल्याला पैसे परत मिळत नाहीत, आपले पैसे बुडाले, आपण फसलो, हे लक्षात आल्याने काही लोकांनी तिच्यावर तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर रुजा अचानक गायब झाली. २०१७ पासून रुजा गायब झाली, ती आजवर कोणालाही सापडलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.