काय आहे सचिन वाझेंचा इतिहास?

ज्या भूमिकेमुळे बिगबींचे करिअर घडले, ती भूमिका आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात बजावत असणा-या वाझेंना मात्र आज आरोपीच्या पिंज-यात का उभं केलं जात आहे? काय आहे सचिन वाझेंचा इतिहास?

“जब तक बैठनेको कहा ना जाए चुपचाप शराफत से खडे रहो, यह पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही…” हा नुसता डायलॉग ऐकला की आपल्या डोळ्यासमोर ऊभे राहतात ते अॅंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन. या डायलॉगमुळे आणि या सिनेमातील पोलिस अधिका-याच्या भूमिकेमुळे बिगबींना रातोरात स्टार केले आणि पुढे त्यांची एक प्रदीर्घ अशी यशस्वी कारकीर्द सुरू झाली. तेव्हापासून या पदाच्या पर्सनॅलिटीबाबत आपल्यात एक भलतीच क्रेझ आहे. आपण कुठलाही गुन्हा केलेला नसला तरी पोलिस आपल्या समोर जरी आले तर आपल्याला धडकी भरते. म्हणजे गुन्हेगारांवरच नाही तर तुमच्या आमच्या सारख्या सामांन्यांवर सुद्धा या पदाची मोठी दहशत आहे. कारण आपण सिनेमात बघितलंच आहे, एकदा का पोलिसांची ‘सटकली’ की ते सिंघम प्रमाणे दबंग कारवाई करतात.
गेले काही दिवस राज्यात चर्चेत असलेलं नाव सचिन वाझे. पोलिस अधिकारी असलेल्या वाझेंवर मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आणि सगळे वातावरण ढवळून निघाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे असं सांगत, वाझे यांच्या निलंबनाची जोरदार मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ज्या भूमिकेमुळे बिगबींचे करिअर घडले, ती भूमिका आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात बजावत असणा-या वाझेंना मात्र आज आरोपीच्या पिंज-यात का उभं केलं जात आहे? काय आहे सचिन वाझेंचा इतिहास?

हिरेन यांच्या पत्नीचा आरोप

सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबई पोलिस दलात पुन्हा रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचे मालक, मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून, सचिन वाझे यांच्यावर मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांनी आरोप केला आहे.

त्या दिवसापासूनच वाझे चर्चेत

मुंबई पोलिस विभागाच्या गुन्हे विभागातील महत्वाची मानली जाणा-या गुप्तवार्ता शाखे(सीआययू)चे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्या दिवसापासूनच सचिन वाझे खरे चर्चेत आले होते. सीआययूचे प्रभारीपद हे पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्याचे असताना या प्रभारी पदावर सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी कसा राहू शकतो, हा प्रश्न मुंबई पोलिस दलात अनेकांना पडला होता.

१६ वर्षांचे निलंबन

१९९०च्या बॅचचे पोलिस अधिकारी वाझे यांच्यासह चार अधिकारी यांना ख्वाजा युनूस प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार, मार्च २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ६ जून २०२० रोजी मुंबई पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार, सचिन वाझे यांच्यासह चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्यात आले. १६ वर्षांच्या निलंबन कारवाई दरम्यान न्यायालयीन लढाई लढत असताना, वाझे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या समक्ष शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला होता.

राजकीय वजन की कामाचा मोबदला?

राज्यात महाआघाडीचे सरकार येताच सचिन वाझे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना पोलिस सेवेत रुजू केले गेले. सचिन वाझे यांची पोलिस दलाची कारकीर्द पाहून, वाझे यांची बदली मुंबई गुन्हे शाखेत करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर सीआययू म्हणजेच गुप्तवार्ता युनिटचे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. सचिन वाझे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक असले तरी त्यांच्या बॅचचे अधिकारी आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर आहेत, मात्र निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांची पदोन्नती थांबवण्यात आली असल्यामुळे, वाझे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहिले. मात्र राजकीय वजन म्हणा किंवा त्यांनी पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून, त्यांना मुंबई गुन्हे शाखेत सामावून घेण्यात आले आणि महत्वाचे गुन्हे तपासासाठीचे खाते त्यांच्याकडे देण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here