‘तो’ इंडियन व्हेरिएंट नाहीच… काय आहे WHOचे म्हणणे?

कोरोना व्हायरसच्या कुठल्याही व्हेरिएंटला कुठल्याही देशाच्या नावाने संबोधले जाणार नाही.

160

जागतिक आरोग्य संघटने(WHO)ने कोरोना व्हेरिएंट्सना नाव देण्यासाठी आता ग्रीक अक्षरांचा वापर करण्याचे ठरवले आहे. यामुळे कोरोना व्हायरसच्या कुठल्याही व्हेरिएंटला कुठल्याही देशाच्या नावाने संबोधले जाणार नाही. दि वॉशिंग्टन पोस्टने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामुळे आता ब्रिटन, इंडियन किंवा आफ्रिकन अशा नावांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उल्लेख केला जाणार नाही. याशिवाय आता या व्हेरिएंटना अल्फा, डेल्टा आणि बिटा या ग्रीक अक्षरांनी संबोधण्यात येणार आहे.

भारताने नोंदवला होता आक्षेप

सोशल मीडियावर कोरोनाच्या B.1.617.2 या व्हेरिएंटला इंडियन व्हेरिएंट असे संबोधण्यात आले होते. त्यामुळे भारताने याबाबत आक्षेप घेतला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरसचा भारतीय व्हेरिएंट असा होणारा उल्लेख देशाची प्रतिमा मलीन करत आहे. या कारणास्तव इंडियन व्हेरिएंट म्हणून संबोधले जाणारे सर्व संदर्भ काढून टाकण्यास भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सांगितले. ब्रिटननेही यू.के. व्हेरिएंटच्या उल्लेखाबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही नावे बदलण्याच्या कार्यवाहीला वेग आला.

डब्ल्यूएचओ काही काळापासून व्हेरिएंटची नवीन नावे शोधण्यासाठी काम करत होती. त्यासाठी ग्रीक पौराणिक कथांमधील आकृतींची नावे यासारख्या पर्यायांवर विचार केला जात होता. याबाबत वैज्ञानिकांसह जगभरातील नामांकन आणि संप्रेषण तज्ञांशी सल्लामसलत केली गेली. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे.

लोकांच्या मानसिकतेवर होतो परिणाम

याबाबत डब्ल्यूएचओच्या साथ रोग विशेषज्ञ मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या व्हायरसच्या व्हेरिएंटला आपल्या देशाचे नाव दिले जाते, त्यावेळी त्याबाबत देशातील सरकार उघडपणे सांगत नाही. डब्ल्यूएचओ या जिनिव्हा-आधारित संस्थेने भौगोलिक स्थानांवरुन संसर्गजन्य रोगांचे नाव देण्यावर कायमच आक्षेप घेतला आहे.

2015 मध्ये डब्ल्यूएचओचे वरिष्ठ अधिकारी कीजी फुकुडा यांच्या म्हणण्यानुसार, आजारांना भौगोलिक स्थानावरुन नाव देणं, हे तेथील लोकांच्या मानसिकतेवर फार परिणाम करणारे आहे. विशिष्ट रोगांची नावे ही विशिष्ट धार्मिक किंवा वांशिक समुदायाच्या सदस्यांविरूद्ध प्रतिक्रिया दर्शवितात. प्रवास आणि व्यापारात अन्यायकारक अडथळे निर्माण करतात. लोकांच्या जीवनावर आणि जगण्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.