महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि ग्यानबा, तुकारामचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरात दाखल होतो. आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्याची देखील परंपरा आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा होणार आहे. पण विठ्ठलाची ही शासकीय महापूजा करण्याला एकदा समाजवाद्यांनी विरोध केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रावर फार मोठं संकट आलं. तेव्हापासून ही पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायला सुरुवात झाली. याबाबतची रंजक माहिती पंढरपूरच्या विठोबाचे पंरपरागत पुजारी अॅड. आशुतोष बडवे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिली आहे.
असा आहे इतिहास
पेशव्यांच्या काळात पंढरपूरच्या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. या समितीच्या सदस्यांकडून आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा होत असे. पेशवाईनंतर इंग्रजांच्या काळात हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षाकाठी दोन हजार रुपयांचे अनुदान देत असत. पण स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपूरात आले, त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.
समाजवाद्यांनी विरोध केला आणि…
पण, 1970 मध्ये समाजवादी लोकांनी निधर्मी राज्यात सरकारने शासकीय पूजा करणे योग्य नसल्याचे सांगत आंदोलन केले. त्यामुळे 1971 साली विठ्ठलाची शासकीय पूजा झाली नाही. पण 1972 मध्ये राज्यात भीषण असा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये राज्यातील शेतकरी आणि जनतेची अवस्था हवालदिल झाली. त्यामुळे सरकारने पूजा बंद केली म्हणून विठ्ठल कोपला आणि राज्यात दुष्काळ पडला, अशी भावना सर्वसामांन्यांत आणि वारक-यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1973 स्वतः पंढरपूरच्या विठोबाची महापूजा करत राज्यावरील संकट दूर करण्यासाठी साकडे घातले. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा करण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.
महापूजेचा मान मिळवणारे पहिले उपमुख्यमंत्री कोण?
1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा स्वतः मनोहर जोशींनी दिंडीत सामील होत सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली होती. त्यामुळे वारीत स्वतः सहभागी झालेले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना या पूजेचा पहिला मान मिळाला.
Join Our WhatsApp Community