कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सीन लसीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संस्थांना होणारा कोव्हॅक्सीन या लसीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतला आहे. काही त्रुटींवर बोट ठेवत हे पाऊल उचलले गेले आहे. त्यामुळे हा पुरवठा रोखल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीन लस प्रभावी असून ती पूर्णपणे सुरक्षित असल्याने त्याबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
…म्हणून WHO ने रोखला लसीचा पुरवठा
कोव्हॅक्सीन लसीचा पुरवठा थांबवण्याबाबतचे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन जारी करून दिले आहेत. या निवेदनात असे म्हटले की, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थांना या लसीचा होणारा पुरवठा थांबवला जावा. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीत लस उत्पादन आणि निर्यात प्रक्रिया यात काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानुसार गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसबाबत काही सूचना करण्यात आल्या आहेत. या त्रुटी कंपनीने दूर कराव्यात, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यानुसार कंपनीकडून हे पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
भारत बायोटेक कंपनीने निवेदन जारी करत कंपनीच्या सर्व युनिट्समध्ये कोव्हॅक्सीनचे उत्पादन कमी करण्यात आल्याचे स्पष्ट केलेले आहे. मागणीतील घट आणि लससाठा खरेदी करणाऱ्या एजन्सीजच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल आम्ही उचलत असल्याचेही नमूद करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसांत कंपनीकडून प्रलंबित बाबी पूर्ण केल्या जातील, असेही स्पष्ट केले गेले आहे. डीसीजीआय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडे सुधारित योजना आम्ही सादर करणार आहोत.
Join Our WhatsApp Community