माझे पती आत्महत्या करुच शकत नाही, त्यांचा घातपात झाला आहे. असा आरोप मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कांदिवली क्राईम ब्रँचच्या तावडे नावाच्या अधिकाऱ्याचे नाव घेतले असून, त्या अधिकाऱ्याने गुरुवारी रात्री माझ्या पतीला फोन करुन घोडबंदर रोड यथे भेटायला बोलावले होते. रात्री १० नंतर माझ्या पतीचा मोबाईल फोन स्विच ऑफ लागत होता, असे मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिने म्हटले आहे. कांदिवली क्राईम ब्रँचचा हा तावडे नावाचा अधिकारी कोण? आणि त्याने मनसुखला फोन करुन का बोलावले होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आत्महत्या की घातपात?
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली मोटार आढळून आली होती. त्या मोटारीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीत सापडला. मनसुख यांच्या तोंडावर पोलिसांना एक मास्क आणि मास्कच्या आतमध्ये दोन ते तीन हात रुमाल असल्याचे तपासात कळले आहे. मनसुख यांनी आत्महत्येपूर्वी तोंडाला मास्क लावून आत्महत्या केली का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच मनसुख याच्या अंगात शर्ट नसल्याचे दिसून येत आहे. मनसुख यांनी गुरुवारी रात्री कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असती, तर एवढ्या लवकर म्हणजे सकाळी १० वाजता मृतदेह लगेच रेतीबंदर येथील चिखलात कसा काय सापडला असता. पाण्यात मृतदेह फुगतो, मात्र मनसुख यांचा मृतदेह बघितला तर तो फुगल्यासारखा वाटत नव्हता. त्यामुळेच मनसुख यांच्या मृत्यूमध्ये घातपाताचा संशय वाटत आहे.
काय घडले त्या रात्री?
याबाबत मनसुख यांचे मोठे बंधू विनोद हिरेन यांनी माझा भाऊ आत्महत्या करुच शकत नाही, तो एवढा कमजोर नव्हता असे म्हटले आहे. तसेच मनसुख यांची पत्नी विमला यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली माहिती अशी की, मागील आठ दिवसांपासून माझ्या पतीला पोलिसांचे चौकशीसाठी फोन येत होते. माझे पती पोलिसांना तपासात सहकार्य देखील करत होते. आमची मोटार विक्रोळी येथून चोरीला गेल्यानंतर आम्ही विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. गुरुवारी रात्री माझ्या पतीला एक फोन आला. मी त्यांना त्याबाबत विचारले असता, कांदिवली क्राईम ब्रांच येथून तावडेचा फोन आहे, त्यांनी घोडबंदर येथे मला भेटायला बोलावले आहे, असे बोलून ते रात्री घरातून बाहेर पडले. त्यानंतर मी त्यांना रात्री १० वाजता फोन केला तर त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता, असे मनसुख यांची पत्नी विमला यांनी पत्रकारशी बोलताना सांगितले.
अनेक प्रश्न अनुत्तरित
मनसुख हिरेन यांना गुरुवारी रात्री फोन करणारा तो अधिकारी कोण होता? त्या अधिकाऱ्याला मनसुख गुरुवारी रात्री भेटले होते का? त्यांच्यात काय बोलणे झाले? दुसऱ्या दिवशी मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत कसा काय आला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून, या सर्वांचा तपास पोलिस यंत्रणा करणार का, असा सवाल जनसामांन्यांना पडला आहे.