अलीकडे रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढ धोरणामुळे मागच्या वर्षभरात बँकांचे मुदतठेवींवरील (Bank Fixed Deposits) व्याजदर चढे आहेत. शिवाय काही मुदतठेव योजनांना करबचतीचा फायदाही मिळत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा अशा मुदतठेवींकडे आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका मुदतठेव योजनेविषयी सांगणार आहोत जिथे व्याजदर बँकेच्या मुदतठेवीपेक्षा जास्त आहे.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत (POTD) तुम्हाला पाच वर्षांच्या मुदतीसाठी ७.५ टक्के व्याजदर मिळतो. सरकारी किंवा खाजगी बँका आपल्या कर बचतीची तरतूद असलेल्या कुठल्याही मुदतठेवीवर इतका व्याजदर देत नाहीत. २०२३च्या जुलै – सप्टेंबर तिमाहीत पोस्टाच्या मुदतठेवींचा सुधारित व्याजदर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट बँकांचे पाच वर्ष मुदतठेवीवरील जास्तीत जास्त व्याजदर हे ७.२५ टक्के इतके आहेत. अशावेळी बँकांमधील मुदतठेवींवरच विश्वास ठेवावा की, पोस्टाच्या योजनेत सहभागी व्हावं हे समजून घेऊया…
पोस्टाच्या मुदतठेवीची वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिसच्या मुदतठेवीचं काम बँकांच्या मुदतठेवींसारखंच चालतं. तुम्हाला ठरावीक कालावधीसाठी आपले पैसे योजनेत गुंतवायचे असतात. त्यावर पूर्वनिर्धारित व्याजदराने तुम्हाला व्याज मिळतं. आणि कालावधी संपल्यावर पूर्व निर्धारित रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. पोस्टाची योजना सरकारी असल्यामुळे तिला सर्वात जास्त सुरक्षितता असते.
सुधारित व्याजदरांनुसार, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत पोस्टाच्या मुदतठेव योजनेवर ७.५ टक्के व्याज लागू झालं आहे. तर खाजगी बँकांपैकी एकटी DCB बँक यापेक्षा जास्त म्हणजे ७.७५ टक्के इतका व्याजदर तुम्हाला देऊ करते. बाकी सगळ्या बँका पाच वर्षांच्या मुदतीसाठी कमी व्याजदर देतात. HDFC, IDFC फर्स्ट, ICICI, ॲक्सिस या बँका पाच वर्षं मुदतीसाठी ७ टक्के दराने व्याज देऊ करतात. तर इंडसइंड बँकेचा व्याजदर आहे ७.२५ टक्के. स्टेट बँक पाच वर्ष मुदतीसाठी ६.५ टक्के व्याज देते. हे पाहता इतर कुठल्याही बँकेपेक्षा (DCB बँकेचा अपवाद वगळता) पोस्टाच्या योजनेचा व्याजदर जास्त असल्याचं दिसेल.
पोस्टाच्या मुदतठेवीत व्याज दर तिमाहीला मोजलं जातं. आणि चक्रवाढ पद्धतीने वर्षानंतर तुमच्या खात्यात जमा होतं.
(हेही वाचा – ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य -५.०’ : २६३८ बालकांचे आणि ३०४ गरोदर मातांचे होणार लसीकरण)
पोस्ट मुदतठेव सुरू कशी करायची?
कुठल्याही बँकेप्रमाणेच पोस्टाची मुदतठेव सुरू करणंही सोपं आहे. फक्त इथं तुमचं पोस्टात बचत खातं असणं अनिवार्य आहे. हे खातं जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्वरित उघडता येतं. पोस्टात खातं उघडण्यासाठी तुम्ही फक्त भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. दहा वर्षांवरील अल्पवयीन मुलही पोस्टात स्वतःच्या नावावर खातं उघडू शकतात.
पण, पोस्ट खातं उघडण्याच्या तुलनेत बँकेत खातं उघडणं जास्त सोपं आणि ती प्रक्रियाही सुटसुटीत आहे.
पोस्टाच्या मुदतठेवीत गुंतवणुकीची किमान मर्यादा एक हजार रुपये इतकी आहे. तिथपासून ते जास्तीत जास्त कितीही पैसे तुम्ही या योजनेत गुंतवू शकता. अर्थात, यात करबचतीचा फायदा फक्त दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरच मिळेल.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्टातल्या मुदतठेवीतून सहा महिने तुम्ही पैसे काढून घेऊ शकत नाही. सहा महिने ते एक वर्षं या कालावधीत पैसे काढलेत तर त्यावर पोस्टातील बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल. ते POTD प्रमाणे मिळणार नाही.
बँक मुदतठेव आणि पोस्टाची मुदतठेव यांचा तौलनिक अभ्यास करून तुम्ही मुदतठेव गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय निवडू शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community