शेर शिवराज हा चित्रपट 22 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटनांना उजाळा दिला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या मुलाच्या नावावरुन ट्रोल करणा-या ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिले आहे. भारतरत्न जेआरडी टाटांच्या नावाने आपण आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याचे मांडलेकर यांनी यावेळी सांगितले.
…म्हणून मुलाचं नाव जहांगीर ठेवलं
छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवराज अष्टक या आठ चित्रपटांच्या मालिकेतील चौथा चित्रपट शेर शिवराज 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अषटकातील हा चित्रपट आणि याआधीच्या तिन्ही चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. पण याच टीकेला आता मांडलेकर यांनी उत्तर दिले आहे.
माझ्या मुलाचा जन्म जमशेदी नवरोसच्या दिवशी झाला. त्यामुळे मी भारतरत्न जेआरडी टाटांच्या नावावरुन त्याचं नाव जहांगीर असं ठेवलं. भारताला एअर इंडिया आणि टायटन सारख्या अनेक कंपन्या देणा-या मोठ्या माणसाचं नाव आपल्या मुलाला द्यावं, हा त्यामागचा हेतू असल्याचे चिन्मय मांडलेकर यांनी म्हटले आहे
(हेही वाचाः केवळ बारा मिनिटांत ‘असा’ मिळवा मालमत्तेचा ‘सातबारा’)
महाराजांमुळे जहांगीर भारावलेला आहे
फर्जंद चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला त्यावेळी जहांगीर तीन ते चार वर्षांचा होता. त्यावेळी आमच्या एका मित्राने त्याला छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट म्हणून दिली होती. आजही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर जहांगीर गणपती बाप्पा आणि महाराजांच्या त्या मूर्तीच्या पाया पडतो, असे चिन्मय मांडलेकर यांनी सांगितले.
यावेळी जहांगीरच्या शाळेत घडलेली एक गंमतीदार आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. जहांगीरच्या शाळेतील धावण्याची शर्यत होती. त्यावेळी त्याने कपाळाला माती लावून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी शर्यत सुरू झाल्याचे भानही त्याला राहिले नव्हते, इतका तो महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासामुळे भारावलेला आहे, असे मांडलेकर यांनी सांगितले.
(हेही वाचाः मशिदींमध्ये सीसीटीव्ही का नाहीत? मनसेच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी दिलं उत्तर)
Join Our WhatsApp Community