रेपो रेट वाढला की सर्वसामांन्यांची कर्ज का महागतात? वाचा सोप्या शब्दांत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नुकतीच बँकांच्या रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. 4 टक्क्यांवरुन 4.40 टक्क्यांपर्यंत हा रेट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्यांना मिळणारी कर्ज महागणार आहेत. पण बँकांच्या रेपो रेटमध्ये वाढ झाली की, सर्वसामांन्यांची कर्ज कशी महागतात?

(हेही वाचाः कर्ज महागली! कोरोनाच्या काळानंतर २ वर्षांनी वाढवला रेपो दर )

काय असतो रेपो रेट?

देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील सर्व बँका कर्ज घेत असतात. एक दिवस ते 56 दिवसांच्या अल्पकाळासाठी बँका जेव्हा आरबीआयकडून कर्ज घेतात, तेव्हा त्या कर्जावर आरबीआय ज्या दराने व्याज आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. एका दिवसासाठीच्या रेपो रेटला एकदिवसीय रेपो(overnight repo) तर 2 ते 56 दिवसांच्या रेपो दराला मुदत रेपो(term repo) म्हणतात.

(हेही वाचाः ‘ही’ आहे इंग्रजांच्या काळातली भारताची पहिली ‘आत्मनिर्भर’ बँक)

कसा होतो व्यवहार?

कर्ज घेताना बँका आपल्या जवळील सरकारी बॉंड तारण म्हणून रिझर्व्ह बँकेकडे ठेवतात. समजा, बँक ऑफ इंडियाने एका दिवसासाठी आरबीआयकडून 100 कोटींचे कर्ज घेतले आणि त्यावर आरबीआयने रेपो रेटनुसार 1 कोटी रुपयांचे व्याज आकारले. तर बँक ऑफ इंडियाला 101 कोटी रुपयांचा सरकारी बाँड आरबीआयकडे तारण म्हणून ठेवावा लागेल. त्यानंतर दुस-या दिवशी बँक ऑफ इंडियाला 101 कोटी रुपये देऊन हा बॉंड आरबीआयकडून परत घ्यावा लागेल.

(हेही वाचाः महाराष्ट्रात तयार झालेत ‘दहा’ नवीन जिल्हे, कोणते? वाचा)

या व्यवहारात काय झालं?

  • गरजेच्या वेळी बँक ऑफ इंडियाला 100 कोटी रुपये मिळाले.
  • रिझर्व्ह बँकेला केवळ एका दिवसात 1 कोटी रुपयांचे व्याज मिळाले.

(हेही वाचाः 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)

आता याच व्यवहारात समजा आरबीआयने रेपो रेट वाढवला, तर बँक ऑफ इंडियाला आरबीआयला जास्त व्याज द्यावं लागेल. त्यामुळे बँकेकडील पैसा कमी होईल. जेव्हा बँकेकडे पैसा जास्त असतो तेव्हा बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी दरात कर्ज देतात. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळता राहतो आणि ते वस्तूंची जास्त मागणी करतात. मागणीनुसार पुरवठा झाला नाही की महागाई वाढते. हीच महागाई कमी करण्यासाठी आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्याचे शस्त्र वापरण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here