किती हजार वर्षे लोटली माहित नाही; पण आजही श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन थोर पुरुषांबद्दल जनमानसात असलेला आदर आणि आकर्षण तिळमात्र कमी झाल्यासारखं वाटत नाही. त्यांना बहाल केलेलं देवत्व एक दोन घटकांसाठी बाजूला ठेवलं आणि माणूस म्हणून जर त्यांचा विचार केला आणि त्यांचं मोठेपण नक्की कशात आहे हे शोधायचा प्रयत्न केला तर दोघांमध्ये सामायिक असलेली एक गोष्ट मला कायम ठळकपणाने नजरेसमोर येते आणि ती म्हणजे विवेक! सर्वसाधारणपणे साधारण बुद्धीमत्ता लाभलेला सर्वसामान्य माणूसही योग्य आणि अयोग्यमध्ये फरक करू शकतो. पण जेव्हा योग्य आणि अयोग्य, सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म हे जेव्हा बेमालूमपणे एकमेकात मिसळलेले असतील अशा वेळेला माणसाच्या बुद्धीचा खरा कस लागतो.
मी राज्य सोडलं म्हणजे राजेपण सोडलं नाही
वडिलांनी दिलेला शब्द पाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे असं म्हणून हाती आलेलं राज्य वैभवाचं ताट सहजपणे दूर सारून वनात जाणारा राम मनाला स्पर्श करत असतांनाच; `नसता गेला वनात तर काही बिघडलं असतं का?, वचन दशरथाने दिले होते!, नाहीतरी भरताने तरी कुठे राज्य स्विकारलं?’ असे तत्त्व बाजूला ठेऊन व्यवहारी शहाणपण देणारा सामान्य माणसाचे विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय रहात नाही. कारण इतक्या पराकोटीचा कर्तव्याला जागणारा विचार मला पेलवणाराही नाही असं वाटत. वालीला झाडाआडून बाण मारणारा राम परत एकदा अपराधीपणाच्या जाळ्यात पकडायचा मी प्रयत्न करते. पण पाण्यात पडलेलं चंद्रबिंब जसं परत परत जाळं टाकूनही जाळ्यात पकडलं जात नाही तसा राम अपराधी ठरत नाहीच तर उलट न्यायनिष्ठूर अशा लखलखित प्रतिमेने तळपत राहतो. कारण वालीने सुग्रीवाच्या पत्नीचे अपहरण केले त्याक्षणी तो अपराधी आहे. श्रीराम म्हणतात, ”मी राज्य सोडलं म्हणजे राजेपण सोडलं नाही. अपराध्याला शासन करणे हे माझे कर्तव्य आाहे.”
…पण श्रीरामांनी विवेक सोडला नाही
स्त्रीला पळवू नेणे, बलात्कार करणे अशा नरपशूला आजही फाशीची शिक्षा देण्यास न्यायालय कचरते. समाजात जरब बसवणारी अशी शिक्षा दिल्यानेच असे गुन्हे करायला अपराधी धजावत नाही. ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या मानवी हक्कांचे संरक्षण अपेक्षित आहे. अपराध्याच्या नव्हे. आजही आमचे विद्वान आंधळ्यासारखे या विषयावर चाचचपडत राहतात. लांगूलचालन करण्यामुळे त्यांना नेमके विपरीत तेच सत्य वाटते. रामाच्या बाबतीत विचार केला तर सुग्रीवाप्रमाणे वालीही रामभक्त होता.सुग्रीवाहून प्रबळ होता. युद्धासाठी त्याने सुग्रीवापेक्षा जास्त मदत देऊ केली असती. पण जास्त मतं मिळवण्याच्या लोभाने, हव्यासाने श्रीरामांनी विवेक सोडला नाही.
राक्षसांच्या मनात रामाविषयी दहशत निर्माण झाली
वाली ज्याच्याशी युद्ध करेल त्या प्रतिस्पर्ध्याचं अर्ध बळ वालीला प्राप्त होईल असाही त्याला वर आहे. त्यामुळे त्याला काही युक्तीनेच मारणे आवश्यक आहे. वाली आणि सुग्रीव दोघे दिसायला तंतोतंत सारखेच असण्याने रामाने आपली वनमाला सुग्रीवाच्या गळ्यात घातली आणि वालीवर बाण सोडला. त्यात काहीच गैर मानायचे कारण नाही. आम्हाला मानवी हक्क कोणाचे जतन करायचे गुन्हेगारांचे, दरोडेखोरांचे, दहशतवाद्यांचे का ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यांचे या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षांपूर्वी रामाने देऊन ठेवले आहे. मग अत्याचारी पूतना, शूर्पणखा सारखी एखादी स्त्री जरी असेल तरी तिलाही शासन व्हायलाच पाहिजे. त्यांना शासन झाल्यामुळेच स्त्रियांचा वापर करून दहशत माजवणार्या राक्षसांच्या मनात रामाविषयी दहशत निर्माण झाली.
सीतेला वनात सोडणे रामाचा निर्णय योग्य का अयोग्य?
सीतेला वनात सोडणे हा रामाचा निर्णय योग्य का अयोग्य हे बघतांना 5000 वर्षांपूर्वीचा समाज आहे हे आम्ही लक्षात घेत नाही. आत्ता आत्ता ही बलात्कार झालेल्या मुलीसोबत लग्न करायला कोणीही तरूण आपणहून तयार होत नाही. आणि समजा केलंच तर तिचं मूल कोणाचं हयाबद्दल समाज पाठीमागे कुजबुजत राहतो. ही आत्ताची सामाजिक पार्वश्वभूमी मनात ठेऊन विचार केला तर…
सीता शुद्ध आहे हे रामाला माहित असून , पटून उपयोग नव्हता. समाजाने त्यांना आयोध्येची राणी म्हणून स्वीकारणं आवश्यक होतं. समाजानी सीतेची मुलं ही रामाची म्हणून स्वीकारली नसती. त्यांच्यामागे त्यांना ही रावणाची आहेत हे ठरवायला, हिणवायलाही कमी केलं नसतं. जन्मभर राजवाड्यात राहूनही त्यांना वनवासाहून मोठे दुःख नशिबी आले असते. त्यापेक्षा वाल्मिकींच्या आश्रमात राहून त्यांची योग्य काळजी घेतली गेली. अस्र-शस्त्र विद्येत दोघेही कमार इतके पारंगत झाले की श्रीरामांचा अश्वमेधाचा घोडा त्यांनी अडवला. लक्ष्मण, हनुमान सर्वांचा हसत हसत पराभव केला. ज्ञानाने तळपणारे, श्रीरामांसारखे दिसणारे हे कुमार जेव्हा आयोध्येत रामायण गात आले तेव्हा त्यांच्या गुणांनी जनता मोहित झाली रामासारखा चेहरामोहरा असलेल्या कुमारांचा राजपुत्र म्हणून जनतेने स्वीकार केला. असा जनतेकडून स्वीकार आवश्यक होता. उच्चपदावर बसलेल्या माणसाला सर्वांना बरोबर घेऊन जातांना किती सूक्ष्म गोष्टींचा विचार करायला लागतो. किती दाहक विचारांचा सामना करायला लागतो हे तोच जाणे. कुठलेही विचार समाजावर लादून समाज ते स्वीकारत नाही. ते हळुहळुच बदलायला लागतात.
(हेही वाचा – Ram Navami 2022: जाणून घ्या ‘श्रीरामनवमी’चा इतिहास आणि महत्त्व)
आज हार फुले उधळण्यासारखे भक्तांच्या मनातले रामाचे उजळून गेलेले, देवत्व जरी काही काळ दूर ठेवले तरी अत्यंत विरोधी परिस्थितीत माणसांमध्ये अभावाने टिकून राहणारे श्रीरामाचे असंख्य विलोभनीय गुण पूर्ण अंधार झाल्यावर आकाशात कोटी कोटी तारका चमकायला लागाव्यात तसे प्रकाशित होतांना दिसतात. माणसाने एक व्यक्ती म्हणून उदार क्षमाशील असणे जेवढे आवश्यक तेवढेच तो राजा म्हणून सिंहासनावर बसल्यावर न्यायनिष्ठूर राहणे हे त्याहूनही अधिक आवश्यक आहे. अठरा अठरा वेळा सोरटी सोमनाथ फोडणार्या आणि लुटणार्या गझनीच्या महम्मदाला केलेली क्षमा फक्त एकट्या पृथ्वीराजाच्याच आंगलट आली नाही तर संपूर्ण देशाला विनाशाच्या गर्तेत टाकून गेली.
श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी केलेल्या राजा रामाचे वर्णन म्हणूनच मला आवडले
असे शुद्ध चारित्र्य आदर्श ज्याचे । असे पूर्ण जो सच्चिदानंदरूपे
गुणांना प्रतिष्ठा जया आश्रयाने। स्वयंसिद्ध कर्तृत्व ज्याचे विराजे।। 1.1
महत्ता जिथे राहते सर्वभावे । जिथे स्तब्ध लावण्य अद्वैतरूपे
जिथे गुह्यही मौन होऊनि राहे। गुणांनाहि लाभेच पूर्णत्व जेथे।। 1.2
सुखा सापडे जो किनाराच येथे। असे मोक्षदायी सदा नाम ज्याचे
जयासी सदा चित्तभावे वरावे। अशा राघवा वंदितो प्रेमभावे।। 1.3
हितासी जनांच्या जपे दक्षतेने। करी नित्य कल्याण सार्या प्रजेचे
असे राज्यकर्ता असामान्य स्वामी। असे न्यायनिष्ठूर राजा विरागी।। 2.1
तयासारिखा अन्य कोणी नसे रे । जगी राम तो एकची राम आहे
असे मान्य लोकांत सद्वर्तनाने । विराजे सदा चित्ति जो प्रेमभावे।। 2.2
जणू सौख्य सारेचि आकार घेई । स्वये रामरूपे दिसे लोचनांसी
निराकार जे ब्रह्म ते रामरूपी । तया ‘तारकब्रह्म’ संबोधिताती।। 2.3
असे इंद्रियांच्यावरी थोर ताबा। नसे अंत वा पार या राघवाचा
असे शक्तिशाली कलांचाहि स्वामी । जया आदरे देवही वंदिताती।। 2.4
असे श्रेष्ठ सम्राट प्रख्यात लोकी। नसे यावरी अन्य सत्ता कुणाची
असे जानकीनाथ जो श्रेष्ठ लोकी । तया वंदितो प्रेमभावे सदा मी।।