मोबाईलपासून विमानापर्यंत सगळीकडे वापरतात सेमीकंडक्टर्स, काय आहे त्यांचा उपयोग?

वेदांता-फॉक्सकॉन ही सेमीकंडक्टर कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इल्क्ट्रॉनिक वस्तूंमधल्या एक छोटासा पार्ट बनवणा-या कंपनीवरुन इतकं मोठं राजकीय वादळ उठू शकतं याचा आपण कधी विचारही केला नसेल.

मूर्ती लहान पण किर्ती महान म्हणतात ते या सेमीकंडक्टरच्या बाबतीत अगदी लागू पडतं. कारण दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टरचा सर्रास वापर होतो. सेमीकंडक्टरशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे हृदयाशिवाय शरीर.

रोजगारक्षम उद्योग

त्यामुळेच या सेमीकंडक्टर उद्योगाला फार मोठे महत्व आहे. सेमीकंडक्टर बनवणा-या कंपन्यांच्या माध्यमातून देशाला फार मोठा आर्थिक फायदा होत असतो. तसेच ज्या राज्यांमध्ये या कंपन्यांचे प्रकल्प उभारण्यात येतात त्या राज्यांतील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार तर उपलब्ध होतोच पण त्याचबरोबर राज्याचे उत्पन्नही वाढते. पण हे सेमीकंडक्टर म्हणजे आहे काय आणि कुठल्या वस्तूंमध्ये वापरले जातात?

सेमीकंडक्टर म्हणजे काय?

सेमीकंडक्टर्सना चिप्स किंवा सेमीस असेही म्हटले जाते. अगदी रॉकेट, विमानापासून ते फ्रीज आणि मोबाईल फोन्सपर्यंत सर्वच उपकरणांत हे सेमीकंडक्टर्स वापरले जातात.

कॉम्प्युटर्स

कॉम्प्युटर्समध्ये किंवा लॅपटॉपमध्ये दिलेल्या कमांड्स निर्देशित करण्यासाठी सेमीकंडक्टरचता मोठा वाटा आहे. एखादा प्रोग्राम लॉंच करण्यासाठी किंवा कोणतीही फाईल डाऊनलोड करण्यासाठी सेमीकंडक्टर एक बायनरी कोड वापरतो. तसेच मायक्रोप्रोसेसर,मेमरी आणि ग्राफिक प्रोसेसिंग युनिट(GPU)हे कॉम्प्युटर्ससाठी सामान्य सेमीकंडक्टर आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपला कॉम्प्युटर सुरळीत चालायला मदत होते.

स्मार्टफोन्स

स्मार्टफोन्समधील वेगवेगळ्या फीचर्ससाठी सेमीकंडक्टर खूप उपयुक्त आहे. मोबाईलचा डिस्प्ले,नेव्हिगेशन,बॅटरी युसेज या सर्वांचे कार्य सेमीकंडक्टर्सच्या माध्यमातून चालते. फक्त मोबाईल फोनच नाही तर इंटरनेट राऊटर आणि इतर असंख्य टेलिकम्युनिकेशन डिव्हाईसेसमध्ये या सेमीकंडक्टर्सचा वापर करण्यात येतो.

घरगुती उपकरणे

फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर अशी असंख्य घरगुती उपकरणे सेमीकंडक्टर्समुळे चालतात. या उपकरणांमधील तापमान, टायमर,ऑटोमॅटिक फीचर्स इत्यादी असंख्य गोष्टी या सेमीकंडक्टर्सच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जातात. झटपट, मल्टीफंक्शनल आणि टिकाऊ सेवांसाठी सेमीकंडक्टर्स खूप महत्वाचे असतात.

बँकिंग

बँकिंग क्षेत्रासाठी सुद्धा सेमीकंडक्टर्स खूप महत्वाचे असतात. एटीएम मशीन्स,सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑटोमोटेड लॉकिंग सिस्टीम सेमीकंडक्टर्सच्या माध्यमातून नियंत्रित केले जातात.

सायबर सिक्युरिटी

सायबर सिक्युरिटीमध्ये हार्डवेअरपासून सर्वच बाबतीत सेमीकंडक्टरचे महत्व असते. मोशन डिटेक्शनसह कॅमेऱ्यातील दर्जेदार सेमीकंडक्टर जलद सूचना देण्याचे काम करतात.

वैद्यकीय उपकरणे

वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. क्लिष्ट आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक मशिन्सच्या सहाय्याने केल्या जातात. या सर्व मशिन्स पॉवर, सेन्सर्स, तापमान, दाब, गणना आणि इतर अनेक कार्ये सेमीकंडक्टर चिप्सशिवाय करुच शकत नाहीत.

वाहने

कार, ​​बस, ट्रेन आणि विमाने अशा मोठ्या वाहनांमध्ये सुद्धा सेमीकंडक्टर वापरले जातात. जीपीएस,वाय-फाय हे सेमीकंडक्टर्सच्या माध्यमातूनच कंट्रोल केले जातात.

महसुलात मोठा वाटा

इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशन (IESA) आणि काउंटरपॉइंट रिसर्च यांच्या संयुक्त संशोधनानुसार, ‘इंडिया सेमीकंडक्टर मार्केट रिपोर्ट, 2019-2026’ नुसार, भारताच्या सेमीकंडक्टर घटक बाजाराचा एकत्रित महसूल 2021-2026 या कालावधीत 300 बिलियन डॉलरवर जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा उद्योग भारतासाठी फार महत्वाचा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here