पश्चिम व मध्य रेल्वेच्या सुविधांमध्ये भेदभाव का?

112

मुंबईतीलच एका प्रथितयश दैनिकाने गेल्यावर्षी दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या बातमी नुसार,

>>मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा दावा : ठाणे-दिवा पाचवी व सहावी मार्गिका हा महत्त्वाचा प्रकल्प रखडत असल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत, जलद मार्गावरील लोकल सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबानेच धावतील, त्या नंतर त्यात सुधारणा होईल<<

हा जो काही दावा वर्षभरापूर्वी केलेला होता तो आता पाचवी सहावी मार्गिका सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही पार खोटा ठरलेला आहे आणि उपनगरीय गाड्या अगदी आजही विलंबानेच धावत आहेत. त्यातच पुन्हा तांत्रिक बिघाड व आज झाले तसे गाड्यांचे अपघात, अनेक ट्रेन्सचा खोळंबा, गाड्या रद्द होणे, सेवा रद्द होणे, प्रसंगी प्रवाशांचे जीव जाणे, प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होऊन, लटकत आणि कोंबलेल्या प्राण्यांसारखा प्रवास करणे भाग पडत आहे. या बद्दल रेल्वेचे काय म्हणणे आहे. अजून किती काळ प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे? ही उदासीनता का? लोकांच्या जीवाशी खेळ का? काही भयंकर अपघात झाल्याशिवाय रेल्वे मंत्रालय, मंत्रीमहोदय, रेल्वे प्रशासनाला जाग येणार नाही आहे का? अशा काही घटनेची रेल्वे वाट पाहत आहे का?

कुर्ला ते कल्याणपर्यंत असलेले (आत्ता झालेले) सहा मार्ग पुढे उत्तरेकडे नाशिक व दक्षिणेकडे पुणे येथे मार्गस्थ होताना केवळ २ मार्गच राहतात त्यामुळे कालीनपर्यंत येणाऱ्या गाड्या फलाटावर येण्यासाठी व पुढे निघण्यासाठी क्रॉसिंग सिग्नलच्या प्रतीक्षेत खोळंबल्या असतात. हा झालेला उशीर भरून काढण्यासाठी मग पुढील स्थानकांमध्ये गाड्या फार कमी वेळ थांबतात किंवा मग अधिकृतपणे वेळापत्रकात वेळेचे फेरफार करून हा उशीर लपवला जातो. यात प्रवाश्यांचे हाल होतात हे सत्य दिसून येत नाही. त्यामुळे कल्याण पुढील स्थानकातील प्रवाश्यांच्या समस्या हा नवीन लेखाचाच विषय होईल.

प्रवाशांना काय अपेक्षित आहे ?

* सेवा नियमित व वेळेत असावी. तसे असले तर प्रवासी इतर कोणत्याही समस्येबद्दल जास्त तक्रार करणार नाहीत कारण प्रवाश्यांना पण रेल्वेच्या भल्यामोठ्या कारभाराची जाणीव आहे.

* मुंबई उपनगरीय सेवा (MSR) हा वेगळा विभाग अस्तित्त्वात यावा आणि जेवढे उत्पन्न उपनगरीय सेवेतील प्रवाश्यांकडून रेल्वे मिळवते त्या प्रमाणात रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय रेल्वेमध्ये सुधारणा करण्यासाठी खर्च केला पाहिजे. मुख्य म्हणजे सुरक्षितता.

* पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा तुलनेने मध्य रेल्वेपेक्षा सरस आहे, कोणतीही सुधारणा आधी पश्चिम रेल्वेवर सुरू केली जाते मग ती मध्य रेल्वेवर येते हा भेदभाव का ?

* मूलभूत सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता, त्रैभाषिक सूत्रानुसार योग्य मराठीत वेळेवर उद्घोषणा.

* सर्व उपनगरीय गाड्या लवकरात लवकर १५ डब्यांच्या व्हाव्यात तसेच सर्व १२ आणि १५ डब्यांच्या गाड्यांचे लेडीजचे सर्व डब्बे मध्ये एकत्र आणून महिलांची धावपळ व अडचण दूर करावी. त्याच प्रमाणे दिव्यांग प्रवासी, मालवाहतूक डब्बे, ज्येष्ठ नागरिक, आजारी किंवा मेडिकल हेल्प आवश्यक असणारे रुग्ण यांच्या साठी काही विशेष सोय

या लेखमालेच्या लिखाणाच्या दरम्यान काही उपायांचा पण आपण विचार करत होतो. सरते शेवटी सारांश रूपाने त्या उपाययोजनांची उजळणी करूया.

१. रेल्वेची स्वतःची जागा आणि साधन-संपत्ती असूनही अनास्थेमुळे रेल्वे साधन-संपत्तीचा आणि जंक्शनचा परिपूर्ण वापर होत नाही तो होणे गरजेचे.

२. उपनगरीय दैनंदिन आणि मेल-एक्स्प्रेसचे प्रवासी यांच्या गर्दीचे विभाजन व नियोजन होणे गरजेचे.

३. ठाकुर्ली टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे.

४. मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर सुरक्षा व व्यवस्थापन.

५. कल्याण डोंबिवलीहून थेट वाशी पनवेल लोकल सुरू करणे.

६. रेल्वेनेच स्थापन केलेल्या काकोडकर समितीचा अहवाल, निष्कर्ष व सूचनांना जर गांभीरतेने घेणे.

७. नवे पादचारी पूल, फलाटांवर एस्केलेटर्स, रेल्वे फाटक बंद करणे, उड्डाणपूल, मध्य रेल्वेचे रखडलेले अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करणे.

८. रेल्वे सुरक्षा दलाला सुरक्षा, स्वच्छता, नियंत्रण, दक्षता आणि समन्वयन यासाठी त्यांच्याकडून अधिक जबाबदारी.

९. PPP तत्त्वांवर विकासकामे व रेल्वे मधील कर्मचारी, कलाकार यांना त्यात सामील करून घेणे.

१०. महाराष्ट्रातील गरजेचे रेल्वे मार्ग प्राधान्याने गती देणे.

या गोष्टींवर रेल्वेने जाणीवपूर्वक लक्ष दिले तर येणाऱ्या वर्षात मध्य रेल्वेचे वेगळे रूप आपल्याला पहिला मिळेल हे निश्चित. ते लवकरात लवकर होवो ही आशा अपेक्षा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.