पंढरपूरचा पांडुरंग कुणाला पावणार?

स्वाभिमानीतर्फे सचिन शिंदे मैदानात उतरले आहेत. स्वाभिमानी संघटना महाविकास आघाडीचा मित्रपक्ष आहे. मात्र शेट्टींनी उमेदवार देत महाविकास आघाडीशी दोन हात केले. त्यामुळे थोडाफार फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असताना पंढरपूरकरांच्या नजरा लागल्या आहेत त्या पोट निवडणुकीच्या निकालाकडे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेची पोटनिवडणूक लागली. मात्र या निवडणुकीत भाजपने उडी घेतल्याने या निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगला. भाजपने मंगळवेढ्याचे समाधान अवताडे यांना तिकीट दिले, तर राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना तिकीट दिले. पण खरी रंगत आणखी वाढली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन शिंदे यांना उमेदवारी दिल्याने.

दिग्गजांनी गाजवला प्रचार!

या निवडणुकीला खरी रंगत आली ती दिग्गजांच्या प्रचाराने. पहिल्यांदाच शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार करत महाविकास आघाडीचा धर्म पाळला. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मैदान गाजवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपवर हल्ला चढवला. एवढेच नाही तर अजित दादांचा शिवसेनेच्या शाखेत गेलेला एक फोटो देखील व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा : कोरोनाचा कहर : लाट लवकर ओसरली नाही, तर कब्रस्तानातही जागा अपुरी पडेल! )

भाजपनेही शक्ती लावली पणाला!

भाजपसाठी देखील ही निवडणूक महत्वाची मानली जाते आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याचमुळे भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपला उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. यासोबतच स्थानिक समीकरण बदलण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपाने केला आहे. पंढरपूर विधानसभा क्षेत्रात २०१९च्या निवडणुकीत ३७.४८ % मतदान झाले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत भालके यांनी भाजपाच्या सुधाकर परिचारक यांचा १३,३६१ मतांनी पराभव केला होता. मात्र आता परिचारक स्वतः समाधान आवताडे यांच्या समर्थनार्थ घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, ज्यामुळे भाजपाचे बळ आणखी वाढले आहे. या निवडणुकांमध्ये समाधान आवताडे यांच्या समर्थनात ५४ हजार मतं, त्यांच्या समर्थनार्थ प्रचार करत असणाऱ्या परिचारक यांचे ७३ हजार मते, असे मिळून एकूण १.३० लाख मतांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे ८७ हजार मते फार कमी वाटतात. यासोबतच पाटील यांच्या राजकीय प्रबळ इच्छाशक्तीचा फायदा थेट पक्षाला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच या मतदारसंघात आधीच्या तुलनेत जास्त परिश्रम घ्यावे लागत आहेत, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे समाधान अवताडे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत मैदानात उतरले. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्यासाठी राजू शेट्टी , रविकांत तुपकर पंढपुरात तळ ठोकून होते. यामध्ये चंद्रकांत दादा, फडणवीस विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला होता. भाजपसाठी लिटमस टेस्ट असून त्यामुळेच भाजपने विजयासाठी आटापिटा सुरू केल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या विधानसभा पोटनिवडणुकीत विजयासाठी भाजपाने प्रत्येक पातळीवरील आपल्या कॅडरला पूर्णपणे झोकून दिले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मराठा असल्यामुळे येथे ५५ % मराठा समाजाचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण 22 गावे आहेत. पंढरपुरातील उरलेली गावे माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडलेली आहेत. पंढरपूरचे देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. काँग्रेसच्या शिवाजी काळुंगे यांना 7,232 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या भारत भालके यांचा या निवडणुकीत अवघ्या 13 हजार 361 मतांनी विजय झाला होता.

(हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब प्यायचेही झाले ‘वांदे’! आता झिंगणेही झाले ‘महाग’…)

स्वाभिमानी बिघडवणार का गणित?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या पोट निवडणुकीत स्वाभिमान शेतकरी संघटनेने एन्ट्री केल्याने राष्ट्रवादी काँगस आणि भाजपची धाकधूक वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी देखील या निवडणुकीत तळ ठोकला आहे. स्वाभिमानीतर्फे सचिन शिंदे मैदानात उतरले आहेत. स्वाभिमानी संघटना महाविकास आघाडीचा मित्रपक्ष आहे. मात्र शेट्टींनी उमेदवार देत महाविकास आघाडीशी दोन हात केले. त्यामुळे थोडाफार फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजू शेट्टी कुणाचे गणित बिघडवणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here