एटीएसच्या मुंबईतील पथकाने दाऊद टोळीचा सदस्य परवेज जुबेर याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक केल्यानंतर एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) दाऊदचा सहकारी छोटा शकील याचा मेव्हणा सलीम फ्रुट याला अटक केली. परवेज आणि सलीम फ्रुट या दोघांवर टेरर फंडिंग केल्याचा आरोप आहे. तसेच दोघे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीसाठी काम करत असल्यामुळे या दोन्ही प्रकरणाचा तपास एकाच तपास यंत्रणेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा असून देशविरोधात कारवाई करणाऱ्या आतंकवादी विरोधात तपास करणारी राष्ट्रीय यंत्रणा असल्यामुळे हा एटीएसकडून अटक करण्यात आलेला परवेज जुबेर याचा तपास या यंत्रणेकडे जाण्याची शक्यता आहे. एटीएसने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित असणाऱ्या परवेज जुबेर वैद मेमन याला बुधवारी मुंबईतील अंधेरी येथून अटक केली आहे. परवेज हा ड्रग्स(अमली पदार्थ) पुरवठादार असून, अमली पदार्थ विक्रीतून येणारा पैसा दाऊदच्या माध्यमातून टेरर फंडिंग ( देशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आर्थिक पुरवठा करणे) करत असल्याचा आरोप परवेज याच्या विरोधात करण्यात आला आहे.
एटीएसने परवेजला अटक केल्यानंतर, केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने कुख्यात गुंड आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट याला गुरुवारी अटक केली. सलीम कुरेशी याच्याकडे मागील काही महिन्यांपासून एनआयए चौकशी करत होती. त्याला अनेकवेळा एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, एनआयएला मिळून आलेल्या पुराव्यावरून एनआयए ने सुओ-मोटो दाखल करून गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. सलीम फ्रुट हा टेरर फंडिंग करत असल्याचा, आरोप त्याच्यावर आहे.
( हेही वाचा: पाकिस्तानातील 1200 वर्षे पुरातन मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश )
एटीएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणा देशाविरोधात कृत्य करणाऱ्या यंत्रणा आहेत. मात्र एटीएस ही राज्य सरकारची तर एनआयए ही केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या यंत्रणा आहेत. एटीएसने अटक केलेल्या परवेज जुबेरचा थेट संबंध दाऊद इब्राहिम याच्याशी असल्यामुळे तसेच दाऊद हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला(आयएसआय ) भारतात दहशतवादी कारवाई करण्यासाठी मदत करत असल्याचा संशय आहे. परवेज जुबेर आणि सलीम फ्रुट हे दोघे दाऊद टोळीसाठी काम करत असल्यामुळे दोघे एकमेकांच्या संपर्कात असण्याची शक्यता असून, एनआयए ही यंत्रणा परवेज जुबेर हे प्रकरण एटीएसकडून आपल्या ताब्यात घेऊन दोन्ही गुन्ह्याचा तपास एकत्र घेण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community