मुंबई पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला? पोलिस दलात चर्चेला उधाण

135

फोन टॅपिंगचा आरोप असणाऱ्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या मुंबई पोलिस आयुक्तपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चेला पोलिस दलात उधाण आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रश्मी शुक्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

मात्र, काही महिन्यांपूर्वीच विवेक फणसळकर हे मुंबई पोलिस आयुक्तपदी विराजमान झाले व त्यांच्या कारकिर्दीत मुंबईतील गणेशोत्सव, शिवसेनेचे दसरा मेळावे शांततेत पार पडले. त्यामुळे फणसळकर यांना आयुक्त पदावरून काढण्यासाठी सरकारकडे ठोस असे कारण नसल्यामुळे सरकारची पंचाईत झाली आहे. मुंबई पोलिस आयुक्त हे पद आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मानाचे आणि तेवढेच महत्वाचे मानले जाते. या पदासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. सेवा ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिस आयुक्त पदी बसण्याचा मान दिला जातो.

रश्मी शुक्लांवर आरोप

१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची चौकशी सुरू असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव दलाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.

(हेही वाचाः दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश, पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान)

ख-या दावेदार शुक्लाच,पण…

मुंबई पोलिस दलाचे तत्कालीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची उचलबांगडी करून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना मुंबई पोलिस आयुक्तपदी बसविण्यात आले होते. पांडे यांच्याकडे काही महिनेच मुंबई पोलिस आयुक्तपद होते व जून महिन्यात पांडे हे पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. पांडे यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला या मुंबई पोलिस आयुक्त पदाच्या दावेकरी होत्या. मात्र त्यांची फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे १९८९ च्या बॅचचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावर निवड करण्यात आली.

राज्याच्या महासंचालक की मुंबई पोलिस आयुक्त?

रश्मी शुक्ला यांच्यावर सुरू असलेला खटला दाखल करण्याची परवानगी मागणारा पोलिसांचा प्रस्ताव राज्य सरकारने नुकताच फेटाळला आहे. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना राज्यात पुन्हा नियुक्त करण्यासाठी व्हिजिलन्स क्लिअरन्स अहवाल केंद्राकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रश्मी शुक्ला यांचा राज्यात परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रश्मी शुक्ला या राज्यात परत येत असल्यामुळे त्यांना राज्याच्या महासंचालकपदी बसविण्यात येणार की, मुंबई पोलिस आयुक्तपदी बसविण्यात येणार? याची जोरदार चर्चा पोलिस खात्यात सुरू आहे.

(हेही वाचाः “प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची कोंडी?)

रश्मी शुक्ला यांना इच्छा

मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार पोलिस महासंचालकपदी १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांना डावलता येणार नसल्यामुळे रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिस आयुक्त पदी बसविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रश्मी शुक्ला २०२४ मध्ये निवृत्त होत असून मुंबई पोलिस आयुक्तपदी बसण्याची त्यांची पूर्वीपासून इच्छा आहे. यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या दिल्लीत भेटल्या होत्या. परंतु मुंबई पोलिस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती होऊन काही महिनेच उलटले आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबईतील उत्सव, शिवसेनेचे दसरा मेळावे शांततेत पार पडले आहेत. त्यांना या पदावरून काढण्यासाठी सरकारकडे कुठलेही ठोस असे कारण नसल्यामुळे सरकार पेचात पडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.