रेल्वे सेवा अधिक सुरक्षित होणार का?

रेल्वेचे संपूर्ण भारतातील सेवा विस्तार जाळे अतिशय मोठे, गुंतागुंतीचे आणि सतत कार्यरत असे आहे. त्यामुळे या सेवेचे नियंत्रण, सुरक्षा व लोकाभिमुख सोयीसुविधा अथकपणे, अविरतपणे, कोणतीही अकल्पित दुर्घटना न होऊ देता, कोणतेही नुकसान न होऊ देता किंवा झालेच तर ते कमीतकमी नुकसानदायक असावे या हेतूने कार्यव्यवस्थापन सुरू होणे गरजेचे आहे. ही सेवा सर्वांना लाभदायक ठरावी यासाठी खूपच दक्ष राहणे, दुर्लक्ष न करणे यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.

( हेही वाचा : जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान )

रेल्वे सेवा अधिक सुरक्षित होणार का?

रेल्वे सेवा पूर्ववत होणार ही बातमी आनंददायी आहेच पण ती अधिक सुरक्षित होणार का हा माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दल जे रेल्वे सेवेत निमलष्करी दलाच्या दर्जानुसार काम करते त्यांना अधिक सक्षम, कार्यरत करावे लागेल व त्या साठी त्यांना अधिकच्या जबाबदारी बरोबर अधिकचे अधिकार ही द्यावे लागतील. सुरक्षा, स्वच्छता, नियंत्रण, दक्षता आणि समन्वयन यासाठी त्यांच्याकडून अधिक जबाबदारी अपेक्षित आहे.

कोरोना काळात रेल्वेने प्रवासी वाहतूक नियंत्रित केली. सर्व लांब पल्याच्या गाड्या आहेत त्याच मार्गाने, होता तेवढाच वेळ व सेवा देत ‘स्पेशल’ दर्जा खाली सुमारे दिड-दोन पट भाडेवाढ करून चालवल्या. अधिकच्या मालगाड्या चालवून माल वाहतुकीतून उत्पन्न मिळवले, त्याच बरोबर ‘किसान रेल’ सारखा स्तुत्य पर्याय उपक्रम चालवून शेतीमाल देशभरात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचवण्यात मदत केली. परंतू रेल्वे सेवा पूर्ववत करताना पूर्वीप्रमाणेच भोंगळ कारभार पुन्हा सूरू होणार का या विषयी चिंता वाटते.

समाधानकारक सेवा मिळणे ही गरज

तिकीटांचे आरक्षण, त्यामधील अनाधिकृत एजंट/एजन्सीची घुसखोरी दादागिरी, गाड्यांमधील अनाधिकृत फेरीवाले व विक्रेते, गुटखा तंबाखू पान थुंकणारे, अनाधिकृत प्रवासी, तिकीट तपासनीसांची ‘मांडवली’, गाड्यांमधील सुरक्षा, स्थानकांतील अनियंत्रित गर्दी, तपासणी, सुरक्षा, प्रवास विलंब, उदघोषणा, सिग्नल यंत्रणांमधील किंवा अन्य तांत्रिक दोष, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींवर तात्काळ चुटकीसरशी उपाययोजना नाही. कोरोना काळात काही काळ या सगळ्याला चाप लागून काहीशी शिस्त आलेली होती हे खरेच. पण हीच शिस्त आणि नियंत्रण रेल्वे सुरक्षा दलातील जवानांच्या सहाय्याने कायमस्वरूपी करता येणार नाही का?

या सेवेचे खाजगीकरण होऊ नये अशी खूप जणांची इच्छा आहे. जो खर्च ही सेवा देताना रेल्वेला येतो तो देशाच्या अर्थसंकल्पातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा खर्च करूनही आत्तापर्यंतचा रेल्वे सेवेचा अनुभव हा फारसा समाधानकारक नाही. उत्पन्न आणि कर वसुली करूनही सेवा मिळत नाही तेव्हा अधिक चीड येते. त्याची अनेक कारणे आहेत. अनेक मार्ग, अनेक अपेक्षा असतात. यासाठी लोकं अधिक पैसा खर्च करायलाही तयार असतात पण त्यांना समाधानकारक सेवा मिळणे ही गरज आहे. त्याबरोबरच प्रशासकीय खर्च, कार्यालयीन खर्च, वेतन आयोगाच्या मंजूर शिफारशीनुसार श्रेणीनुसार कर्मचार्‍यांना वेतन, बोनस, महागाईभत्ता, कंत्राटी पद्धतीने केला जाणारी कामे व त्यावरील खर्च इत्यादी गोष्टींमुळे रेल्वे सेवा हा ‘पांढरा हत्ती’ पोसावा लागत असल्याप्रमाणे झाले आहे. नवीन आलेले रेल्वे कॅबिनेटमंत्री हे राजकारणी नाहीत तर प्रशासकीय सेवेतूनच मंत्री पदावर आलेले असल्याने त्यांनी यात सुधारणा करून आणणे अपेक्षित आहे. व त्यांनी त्यादृष्टीने काही कठोरपणे निर्णय घेणेही अपेक्षित आहे. त्यांनी स्वतः त्यासाठी दोन शिफ्टमध्ये जास्तीचे कामाचे उदाहरण रेल्वे अधिकारी व कर्मचारी वर्गासमोर घालून दिले आहे. या सुधारणा ते घडवून आणतील हा विश्वास वाटतो.

प्रवाशांच्या दृष्टीने विनाविलंब समाधानकारक सेवा,स्वच्छता आणि पुरेशी अतिरिक्त सुरक्षा हेच प्राधान्य ठेवून जर रेल्वे सुरक्षा दलाला यासाठी अधिक कार्यक्षम करता आले तर रेल्वेच्या पुर्ववत सेवेला समाधानाचे कोंदण लाभेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here