पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ७ आणि मेट्रो २ एचा शुभारंभ झाला. त्यांनी ज्या मेट्रोने प्रवास केला, ती मेट्रो मराठमोळ्या तृप्ती शेटे (२७) हिने चालवली. तीन वर्षे नोकरीच्या शोधात असलेल्या तृप्तीला नोकरी मिळाली आणि आता त्यात पंतप्रधान प्रवास करणारी मेट्रो चालवण्याची संधीही मिळाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवास केला होता, तेव्हाही ती मेट्रो तृप्तीने चालवली होती.
खूप उत्साही होते, पण मला माझ्या कामावर विश्वासही होता!
अंधेरी येथील गुंदवली स्थानकावरून मुंबई मेट्रो मार्ग २ए आणि ७च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यानिमित्ताने तृप्तीने माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आपल्याला यावेळी खूप आनंद झाला. मला भीती वाटली नाही. यावेळी खूप उत्साही होते, पण मला माझ्या कामावर विश्वास आहे. मी एक अनुभवी मेट्रो चालक आहे. जेव्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रवास करणारी मेट्रो ट्रेन चालवण्याची संधी मिळाल्याने मी तेव्हा खूप उत्साहित आणि आनंदी होते. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझे आई-वडील आणि सर्व कुटुंबियांना माझा अभिमान आहे.’
कठोर परिश्रमाला पर्याय नाही!
तृप्ती पुढे असेही म्हणाली की, ‘अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला तीन वर्षे नोकरीसाठी संघर्ष करावा लागला. एक महिला असल्याने ही संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. विशेषत: ९१ चालकांच्या मधोमध स्वत:साठी जागा बनवणे फार मोठी गोष्ट होती. सध्या मी म्हणू शकते की, कठोर परिश्रमाला पर्याय नाही आणि जे मेहनत करतात त्यांना त्यांचे ध्येय निश्चितच मिळते.’
९१ चालकांमधून तृप्तीला मिळाली संधी
मुंबई मेट्रो चालवण्यासाठी ९१ पायलट (चालक) आहेत. त्यापैकी २१ महिला असून तृप्ती त्यातील एक चालक आहे. तृप्ती मूळची संभाजीनगर (आधीचे औरंगाबाद) येथील रहिवासी असून एका सामान्य कुटुंबातून पुढे आली. तिने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आणि बॅचलरचे शिक्षण घेतले. त्यानंतर २०२० मध्ये तिने हैदराबादमध्ये मेट्रो पायलटचे अधिकृत प्रशिक्षणही घेतले आहे.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा मुंबईत मेट्रोने प्रवास; सर्वसामान्यांशी साधला संवाद)
Join Our WhatsApp Community