मुंबईत लहान मुले आणि महिलांचा अंमली पदार्थांच्या धंद्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने नागपाडा येथे केलेल्या कारवाईत समोर आली आहे. एनसीबीने नागपाडा येथून एका महिलेला हशिश या अंमली पदार्थासह अटक केली आहे. तिच्या चौकशीत हा प्रकार समोर आल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन किलो हशिश जप्त
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने दोन दिवसांपूर्वी माहीम दर्गा येथे छापेमारी करुन वसीम मोहम्मद शमीम नागोर याला अटक केली होती. तसेच या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणा-या १४ ते १८ वयोगटातील मुलांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. या मुलांचे समुपदेशन करुन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते. माहीम येथील कारवाईनंतर एनसीबीने आपला मोर्चा नागपाडा येथे वळवला. नागपाडा जंक्शन येथून हुसेन बी या महिलेला सुमारे दोन किलो हशिश या अंमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचाः प्रियकराला परत मिळवण्यासाठी ती त्याच्याकडे गेली आणि त्याने जे सांगितले ते केले, पण त्यानंतर…)
ड्रग्सच्या नशेत करुन घेण्यात येत होती कामे
अटक करण्यात आलेली महिला हुसेन बी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची महिला आहे. लहान मुले आणि महिलांना अंमली पदार्थांचे व्यसन लावून, या मुलांचा आणि महिलांचा वापर आपल्या ड्रग्सच्या धंद्यासाठी करत होती, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. १२ ते १७ वयोगटातील मुलांचा वापर मुंबई तसेच राज्याच्या बाहेरुन अंमली पदार्थ आणण्यासाठी केला जात होता. तसेच महिलांचा वापर अंमली पदार्थ लपवण्यासाठी आणि तस्करीसाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. ही सर्व बेकायदेशीर कामे मुलांकडून आणि महिलांकडून ड्रग्सच्या नशेत करुन घेण्यात येत होती, अशीही माहिती समोर येत आहे.
पालक आणि नागरिकांची तक्रार
आम्हाला मागील काही आठवड्यांपासून माहीम, नागपाडा आदी परिसरातून पालकांचे तसेच स्थानिक नागरिकांचे फोन येत होते. त्या परिसरात लहान मुले मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या अधीन गेले असल्याचे सांगण्यात आले. या मुलांना अंमली पदार्थांची सवय लावून त्यांच्याकडून गैरकृत्य करुन घेतली जात होती. ही माहिती मिळाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने माहीम आणि नागपाडा येथे कारवाई केली असता ही धक्कादायक बाब समोर आली असल्याची माहिती, एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.
(हेही वाचाः मुंबईत १०० किलो गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड जप्त)
Join Our WhatsApp Community