कुर्ल्यातील कोहिनूर या ठिकाणी एचडीआयएलने बांधलेल्या पुनर्वसन इमारतीच्या टेरेसवर एका तरुणीचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी पोलिसांना सापडला होता. या तरुणीवर लैगिंग अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती शनिवारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर मृत तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
असा घडला प्रकार
कुर्ला पश्चिम या ठिकाणी असलेल्या कोहिनूर हॉस्पिटल जवळ विमानतळ प्राधिकरनाच्या हद्दीत असलेल्या झोपड्याच्या पुनर्वसनासाठी अनेक वर्षांपूर्वी ‘एचडीआयएल’ बांधकाम कंपनीकडून मोठ्या प्रमाणात इमारती बांधून तयार आहे. त्यापैकी काही इमारतीत नागरिक राहण्यासाठी आलेले असून अनेक इमारती रिकाम्याच पडून आहेत. या रिकाम्या इमारतीत गुन्हेगारी वृत्तीचे तसेच नशा करणाऱ्याचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
(हेही वाचा – चिंताजनक! आर्थिक राजधानी तरीही 36.09 टक्के लोकसंख्या कुपोषित)
शवविच्छेदन अहवालातून आले समोर
रिकाम्या असलेल्या इमारतींपैकी एका इमारतीच्या गच्चीवर गुरुवारी एका महिलेचा मृतदेह इन्स्टाग्राम व्हिडीओ बनवण्यासाठी आलेल्या काही तरुणांना आढळून आला होता. या तरुणांनी ही माहिती पोलिसांना दिली. विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आला. मृत तरुणीची हत्या करण्यात आली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले, तसेच या तरुणीवर लैगिंग अत्याचार झाल्याचे शुक्रवारी पोलिसांना मिळालेल्या शवविच्छेदन अहवालातून समोर आले.
मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून विनोबा भावे नगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्या आणि लैगिंग अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका तरुणीला गच्चीवर आणून तिच्यावर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.