पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI च्या माध्यमातून भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी विविध योजना आखत आहे. भारतीय सैनिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी महिला ब्रिगेड तयार करुन त्यांच्याद्वारे कटकारस्थाने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या या संघटनेत 50 मुलींचा समावेश आहे. भारतीय गुप्तचर संघटनेकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून हा कुटील डाव रचला जात असल्याने भारतीय गुप्तचर संस्थेकडून लष्कर आणि बीएसएफच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून हा धोका असल्याने, सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका, अशी सुचनाही भारतीय गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने भारतीय लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी हनीट्रॅपचे 10 माॅड्यूल तयार केले आहेत. त्यामध्ये 50 पेक्षा जास्त मुली आहेत. लष्करात ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते, त्याच पद्धतीने पाकिस्तान या मुलींना हनीट्रॅपचे प्रशिक्षण देत आहे.
पाकिस्तानी महिला एजंट
सैन्य दलातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे की, हे प्रशिक्षण हैदराबाद, सिंध येथून पाकिस्तानी लष्कराच्या इंटेलिजन्स युनिट 412 द्वारे केले जात आहे. या माॅड्यूलचे लक्ष्य राजस्थान आणि गुजरात सीमेवरील लष्करी तळांवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या सैनिकांवर आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या या महिला एजंट पाकिस्तानी लष्करात ब्रिगेडियर आणि कॅप्टन या पदावर काम करत आहेत.
( हेही वाचा: दिलासादायक बातमी: LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात; असे आहेत नवे दर )
ट्रेनिंगनंतर हाॅटेलमध्ये रुम बुक
महिला ब्रिगेडला नियुक्त केल्यानंतर पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ट्रेनिंग दिले जात असून, ट्रेनिंगनंतर हाॅटेलमध्ये रुम बुक केल्यानंतर या मुलींना मेक- अप किट दिले जातात. यासोबतच रिया, खुशी, कल्पना, नीतू, गीतू, अवनी, मुस्कान आणि हरलीन अशी भारतीय नावेही देण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community