आधी प्रत्यारोपणातून नवे यकृत मिळवले नंतर हृदय, डोळे आणि मूत्रपिंड दान केले; पत्नीच्या निर्णयातून चार जणांना मिळाले नवे आयुष्य

161

गंभीर आजाराला सामोरे जाताना कित्येकदा अवयव निकामी होत असल्याचे निदान होते. वेळेवर नवा अवयव प्रत्यारोपणासाठी न मिळाल्यास कित्येकदा परिस्थिती फारच गंभीर होऊन जाते. आपल्यासोबतच घडलेल्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पत्नीनेच आपला पती तरुण वयातच गमावल्यानंतर अत्यंत धाडसी मनाने अवयवदानाचा निर्णय घेतला. जो अनुभव मी अनुभवला तसा कडवट अनुभव इतर कोणाही अनुभवू नये असे म्हणत अश्विनी पाटील यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर हृदय, मूत्रपिंडे आणि डोळे दान केले.

ही अवयवदान प्रक्रिया ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात झाली. शनिवारपासून प्रशांत पाटील यांचे डोके दुखत होते. गेल्या काही दिवसांपासून झोप पूर्ण होत नसल्याने डोके दुखत असावे, असा अंदाज प्रशांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी बांधला. डोकेदुखी असह्य झाल्यानंतर रविवारी पहाटे अश्विनी यांनी त्यांच्या पतीला ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रशांत पाटील यांना पक्षाघात झाला. त्यांची तब्येत ढासळतच होती. तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याची डॉक्टरांनी अश्विनी यांना पूर्वकल्पना दिली. अखेर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले.

( हेही वाचा: Mumbai Traffic Update: अंधेरीतील ‘हा’ ब्रीज दोन वर्षांसाठी राहणार बंद )

पतीला अवघ्या ३७ व्या वर्षीच मृत्यू ओढावल्याचे दुःख पचवत असतानाच अश्विनी यांनी त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. चार वर्षांपूर्वी तब्येतीच्या कारणास्तव प्रशांत यांनाही नव्या यकृताची गरज होती. त्यांची तब्येत ढासळत असताना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दाता मिळत नव्हता. त्यावेळी यकृताचा काही भाग मी दान केला. हा प्रसंग आठवला की मरणानंतर अवयव दान करण्याचा मी निर्णय घेतला. प्रशांत यांना आता वाचवणे शक्य नाही, ही कल्पना येताच मनोमन मी त्यांचेही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अश्विनी पाटील यांनी दिली. गरजू रुग्णांना वेळेवर नवे अवयव मिळणे कितपत गरजेचे असते, या अनुभवातून आम्ही गेलो आहोत. हा कटू अनुभव कोणाच्याही नशिबी येऊ नये म्हणून मी अवयवदानासाठी पुढाकार घेतला, असेही अश्विनी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.