अरेरे…बेपत्ता मायलेकराचे मृतदेह सापडले नाल्यात

कुर्ला पूर्व येथून दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या मायलेकराचा मृतदेह चेंबूर लालडोंगर येथील नाल्यात मिळाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आईने मुलासह इमारतीवरून नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हरवल्याची तक्रार केलेली

श्रुती महाडिक (३६) आणि राजवीर (साडेतीन वर्षे ) असे या मायलेकराची नावे आहेत. श्रुती हिचे सासर कुर्ला पूर्व कामगार नगर या ठिकाणी असून माहेर चेंबूर लालडोंगर परिसरात आहे. १२ जानेवारी रोजी दुपारी श्रुती मुलगा राजवीरला सोबत घेऊन घर सोडून निघून गेली होती. पती आणि सासरच्या लोकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्यामुळे अखेर पतीने नेहरू नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

सीसीटीव्ही फुटेजमधून शोध लागला

नेहरू नगर पोलिसांनी श्रुतीचा आणि तिच्या मुलाचा शोध घेण्यासाठी कामगार नगरपासून सीसीटीव्हीत फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता श्रुती चेंबूर लालडोंगर परिसरात जात असल्याचे दिसले. दरम्यान पोलिसांनी लालडोंगर आणि तिचे महेर असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता श्रुती माहेर असलेल्या इमारतीत जाताना दिसत आहे, मात्र बाहेर पडताना दिसत नसल्यामुळे पोलिसांनी त्याच परिसरात तिचा शोध सुरु केला. दरम्यान पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारतीच्या मागे असलेल्या नाल्यातील पाणी वर उडताना दिसून आल्यामुळे पोलिसांनी नाल्यात शोध घेतला असता शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता नाल्यात श्रुती आणि राजवीर या दोघांचे मृतदेह मिळाले.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालय या ठिकाणी पूर्वतपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रुती  माहेरी आली मात्र तिने घरी न जाता इमारतीच्या गच्चीवर जाऊन मुलासोबत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास नेहरू नगर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला आहे. नेहरू नगर पोलिसांकडून श्रुतीच्या वडिलांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. श्रुतीने घरगुती वादातून आत्महत्या केली शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here