अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहे. यासाठी २९ मार्चला भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री तसेच अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांचा नातू जरी आला तरी त्यांचे सरकार येणार नाही; अब्दुल सत्तारांचा टोला )
चंद्रपुरातून पाठवणार सागवान लाकूड
यापूर्वी चंद्रपूराकरांनी मोठ्या प्रमाणात अयोध्या मंदिरासाठी रामशीला पाठविल्या होत्या. २९ मार्चला सागवान लाकडांची शोभायात्रा बल्लारपूर येथील वन विभागाच्या डेपोतून निघणार आहे. ही शोभायात्रा चंद्रपुरात दाखल होऊन सायंकाळी चांदा क्लब ग्राऊंड येथे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा संगीताचा कार्यक्रम याठिकाणी होणार आहे.
गंगा आरती सुरू करणार
प्रभू रामाचे नाते महाराष्ट्राच्या पावन भूमीशी असल्याने नाशिकमध्ये लवकरच गंगा आरती सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही सुधीर मुनगंटीवारांनी दिली. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल आणि २०२४ मकर संक्रांतीपर्यंत रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण मंदिर परिसरात आणखी ७ मंदिरे बांधली जाणार असल्याचेही समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community