लोअर परळच्या पुलाचे काम कुणामुळे रखडणार?

130

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील पूल धोकादायक बनल्यानंतर ते पाडून त्याठिकाणी नवीन पूलाचे बांधकाम महापालिका आणि रेल्वेच्या संयुक्त माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील काम नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु नोव्हेंबर २०२१ पर्यंतही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे रेल्वेला नियोजित वेळेत या पूलाचे काम करता आलेले नाही. उलट आता रेल्वेच्या लांबणीवर पडलेल्या कामांमुळे महापालिकेच्या हद्दीतील पूलांच्या बांधकामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे रेल्वेबरोबरच आता महापालिकेच्या कामालाही विलंब होऊन लोअर परळ वासियांना अजून तरी वर्षापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आजपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील काम अपूर्ण

लोअर परळ येथील रेल्वे पुलाचे काम दोन वर्षांपूर्वी महापालिकेने हाती घेतले आहे. या पुलाच्या बांधकामावर सुमारे १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार असून या पुलाच्या बांधणीसाठी जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी निवड करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी जानेवारी २०२० मध्ये सुरुवात झालेली आहे. या रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने १२५ कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यानुसार महापालिकेने रेल्वे प्रशासनाला २५ कोटी १६ लाख रुपयांचे अधिदान दिल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि हे काम नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण झालेले नाही.

पूलाच्या कामाला वेळ लागण्याची शक्यता

रेल्वेच्या हद्दीतील या पुलांच्या बांधकामाबरोबरच महापालिकेच्या हद्दीतील गणपतराव कदम मार्ग व ना. म. जोशी मार्गावरील पुलाचे काम महापालिकेच्यावतीने केले जात आहे. ना.म. जोशी मार्गावरील उत्तर बाजुला असलेल्या पुलाचे पाडकाम करून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु झाले आहे, तर करीरोडच्य बाजुला असलेल्या या मार्गाच्या दक्षिण- पूर्व बाजुला रेल्वेला गर्डर ठेवण्यात आले आहे. मात्र, रेल्वेचे काम न झाल्याने गर्डर तिथेच ठेवण्यात आले आहे, त्यामुळे गर्डर अभावी महापालिकेला करीरोडच्या दिशेला असलेल्या ना.म. जोशी मार्गाकडे जाणाऱ्या उतारतीच्या दिशेचे काम पूर्णपणे रखडलेले आहे. रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या हद्दीतील बांधकामांच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आल्याने हा विलंब झाला आहे. परिणामी या कामाला अजून काही दिवस वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! मुंबई महापालिकेवर नेमणार प्रशासक! कारण…)

पुलाच्या बांधकामासंदर्भातील तोडगा निघणार

महापालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजेंद्र तळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पुलाचे तीन उतरतीकडे जाणारे मार्ग आहेत ज्याठिकाणी महापालिकेच्यावतीने काम सुरु आहे. त्यातील गणपतराव कदम मार्गावरील उतरतीच्या बाजुचे काम पुर्णत्वास येत आहे, तसेच ना.म.जोशी मार्गाच्या पश्चिमेकडील बाजूचे कामही पूर्णत्वास येत आहे. मात्र, या मार्गाच पूर्वेकडील बाजुचे काम रेल्वेचे गर्डर ठेवल्यामुळे होऊ शकलेले नाही. रेल्वेला याबाबत गर्डर बाजुला करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, परंतु अद्यापही त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे लवकरच याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आयुक्तांच्या स्तरावर चर्चा करून या पुलाच्या बांधकामासंदर्भातील तोडगा काढला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.