हिंदमाताच्या धर्तीवर पश्चिम उपनगरातील मिलन सब वे मधील तुंबणाऱ्या पाण्यावर कायमचाच उपाय शोधण्यासाठी भूमिगत टाक्या बांधून मिनी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला. याचे बांधकाम सद्यस्थितीत ६५ ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून या मिनी पंपिंग स्टेशनसाठी पुढील चार वर्षांकरता भाडेतत्वावर पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या पंपाच्या खर्चासह पुढील चार वर्षांकरता सुमारे आठ कोटी रुपये खर्चाला प्रशासकांनी मान्यता दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पंप लावण्याची व्यवस्था नसताना यावर्षी कुठे पंप लावले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : पदवीधर लिपिकांना मिळणार नाही अतिरिक्त वेतनवाढ)
मिलन सब-वे मधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी
पश्चिम उपनगरातील पावसाळ्यात सर्वात जास्त पाणी तुंबण्याचे प्रमुख ठिकाण म्हणजे मिलन सब-वे. याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा वाहनांचा मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे हिंदमाताच्या धर्तीवर मिलन सब वेमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निवारण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मिलन सब वेमधील तुंबणाऱ्या पाण्याकरता के पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मिलन सब वेमध्ये साचणारे पाणी साठवण टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी १२०० मि.मी व्यासाची पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ज्याद्वारे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा जलद गतीने होईल आणि मिलन सब वे मधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर त्या भूखंडावर बांधण्यात येणारी २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित करून भूखंडाची जागा नियमित वापरासाठी केली जाणार आहे. यासाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च केले जात आहे. यासाठी महापालिकेने देव इंजिनिअरींग या कंपनीची नियुक्ती केली आहे.
हिंदमाताच्या ठिकाणी याच कंपनीच्या माध्यमातून भूमिगत टाकीची बांधकाम केले होते, त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून मिलन सब वेचे काम सुरु असून आठ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर एप्रिल महिन्यापासून या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अडीच ते तीन महिन्यांमध्ये भूमिगत टाकी उभारण्याचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.
पुढील चार वर्षाकरता पंप बसवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक
या ठिकाणी पंप लावण्याची व्यवस्था नसतानाही या वर्षीचा समावेश करून पुढील चार वर्षाकरता पंप बसवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या चार वर्षांकरता सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षात टाक्यांचे बांधकाम पूर्ण न झाल्याने पंप लावता येणार नाही,असे अधिकाऱ्यांकडून समजते.
याबाबतत पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मेस्त्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिलन सब वेच्या बनवण्यात येणाऱ्या मिनी पंपिंग स्टेशनकरता पंप बसवण्याकरता मान्यता घेऊन ठेवली आहे. त्यामुळे जर हे पंप बसवता येणे शक्य असेल तर ते बसवले जातील. परंतु जर हे पंप बसवणे शक्य न झाल्यास मिलन सब वेच्या ठिकाणी ज्या प्रकारे दरवर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवले जातात, त्याप्रमाणे पंपांची व्यवस्था केली जाईल,असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community