मुंबईतील पोलीस ठाणी पाण्यात, कामकाज ठप्प

105

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सखल भागात असणाऱ्या काही पोलीस ठाण्यांमध्ये पाणी साचून पोलीस ठाण्यातील कामकाज ठप्प झाले आहे. कुर्ला पूर्वेतील नेहरू नगर, पश्चिमेतील विनोबा भावे नगर तसेच साकिनाका ही पोलीस ठाणी पाण्यात गेली आहे.

पाणी साचून संपूर्ण काम ठप्प

कुर्ला पूर्व येथील नेहरू नगर पोलीस ठाण्याजवळील भाग सखल असून पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला मोठा नाला आहे, प्रत्येक वर्षी मुसळधार पावसामुळे या पोलीस ठाण्यात पाणी साचून ठाणे अंमलदार कक्ष, अधिकारी कक्ष तसेच वरिष्ट पोलीस निरीक्षक यांच्या कक्षात पाणी साचून संपूर्ण काम ठप्प होते.

( हेही वाचा : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; परशुराम घाट आठ दिवस बंद)

जोरदार पाऊस झाल्यावर पोलीस ठाण्याच्या मागे असलेला हा नाला तुडूंब भरून वाहतो, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नाल्याचे पाणी पोलीस ठाण्यात शिरते, अशा वेळी कामकाज करणे अवघड होते, तक्रारदारांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत पोलीस ठाण्यात यावे लागते, तसेच साचलेल्या पाण्यातूनच पोलिसांना बंदोबस्त, गस्तीवर तसेच बचावकार्यासाठी बाहेर पडावे लागत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुर्ला पश्चिमेला असलेले विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याची अवस्था देखील नेहरू नगर सारखीच असून पोलीस ठाण्या शेजारीच मोठा नाला आहे, पोलीस ठाणे सखल भागात असल्यामुळे या ठिकाणी थोडा जरी पाऊस पडला की पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी साचून कामकाज ठप्प होते. साकिनाका, पार्कसाईड, वाकोला या पोलीस ठाण्यात देखील पाणी साचून कामकाज ठप्प झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.