गोरेगाव आणि मुलुंड या दोन महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला असून या प्रकल्पाअंतर्गत गोरेगाव परिसरातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते गुरुवारी पार पडले. त्यामुळे या प्रकल्पातील उड्डाणपूलाच्या कामाला आता सुरुवात होत असल्याने लवकरच या प्रकल्पातील एक टप्पा पूर्ण होणार आहे.
प्रकल्प सध्या प्रगतीपथावर
गोरेगाव मुलुंड लिंक रोड (‘जी एम एल आर’) प्रकल्पांतर्गत गोरेगाव परिसरातील उड्डाण पुलाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबईत विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. मुंबईसारख्या महानगरात दक्षिण- उत्तर वाहतूक सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या तुलनेत पूर्व-पश्चिम भागांना वाहतूक सेवा सुविधा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे विविध वाहतूक पर्याय मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरीय प्रयत्न आणि अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा आणि अंमलबजावणीचा भाग म्हणून ही निश्चितच एक समाधानाची आणि आनंदाची बाब असल्याचे सांगितले.
( हेही वाचा : प्रशासकांनी आणखी ४० प्रस्तावांना दिली मान्यता )
या कार्यक्रमाला खासदार गजानन कीर्तिकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू, माजी उपमहापौर ,एड सुहास वाडकर, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त (परिमंडळ ४) विजय बालमवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, माजी नगरसेविका साधना माने, माजी नगरसेवक तुळशीदास शिंदे, प्रशांत कदम,यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community