मे महिन्याची सुट्टी म्हटली की मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाला गावी जाण्याचे वेध लागतात. काय रे यंदा गावाक जातलस ना? असा प्रश्न तुम्ही चाकरमान्यांनाना विचारल्यास, होय तर गावाक जावकच होया… असे उत्तर सहसा मिळते. मात्र यंदा हाच प्रश्न विचारला, तर यंदा नको रे गाव… असेच उत्तर तुम्हाला मिळेल. त्याचं कारणही तसंच आहे. राज्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाची लाट असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ही लाट सर्वात भयानक आहे. या लाटेला थोपवण्यासाठी ठाकरे सरकारने देखील राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही काही चाकरमान्यांना गावी जायला मिळत नाही.
म्हणून चाकरमान्यांनी गावी जाणे टाळले
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकारने यंदा कडक निर्बंध लावले असून, याचा फटका आता गावी जाण्यास उत्सुक असणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे. त्यातच जर गावी जायचे असेल तर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून, काही जण पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने गावी जाणेच टाळत आहेत. एवढेच नाही तर सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण मागील वर्षाच्या तुलनेत वाढत असून, स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांसाठी कठोर निर्बंध घातले आहेत.
सोबत रिपोर्ट बंधनकारक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जायचे असेल तर खारपाटण येथील चेकपोस्टवर सर्वांचे रिपोर्ट तपासले जात आहेत. त्यांची नोंदणी देखील स्थानिक प्रशासन ठेवत आहे. गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या ६ हजार ६४२ जणांची नोंद चेकपोस्टवर झाली आहे. त्यातील २२५ नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून, यापैकी केवळ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित २२२ नागरिकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
१४ दिवस रहावे लागते होम क्वारंटाईन
दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात असून, त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे गावी जाऊन क्वारंटाईन होण्यापेक्षा मुंबईत राहणे काही जण पसंत करत आहेत.
Join Our WhatsApp Community
मी दरवर्षी मुलांना सुट्टी लागली की, माझ्या गावी जातो. मात्र आता पुन्हा आलेल्या कोरोनामुळे यंदा मी गावी जाणे टाळत आहे. मागील वर्षी मी लॉकडाऊन असताना देखील गावी गेलो होतो. मात्र यंदा गावागावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने, तसेच आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असल्याने मी जाणे टाळले.
प्रदीप गवस, चाकरमानी