आधीच वेतनाची बोंब आता ​लसही मिळेना! राज्यात ‘लालपरी’ दुर्लक्षित

एकीकडे राज्य सरकार नर्स, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, पोलिस यांना प्राधान्याने कोविडची लस देत असताना, राज्य सरकारला आपला विसर पडला की काय?, असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडू लागला आहे.

143

लालपरी.. राज्यातल्या खेड्यापाड्यात धावणारी तुमची आमची सर्वांची लाडकी लालपरी, अर्थात एसटी.. कधी वेतन मिळण्यासाठी तर कधी बोनस मिळण्यासाठी, या लालपरीच्या कर्मचाऱ्यांना संघर्ष करताना आपण पाहिले असेलच. मात्र स्वतःवर इतके आर्थिक संकट असताना, राज्य कोरोनाशी लढत असताना हा एसटी कर्मचारी देखील जीवाची पर्वा न करता सेवा देण्यासाठी रस्त्यावर उतरला. लॉकडाऊनमध्ये सर्व ठप्प असतानाही लालपरी सेवा देत होती. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला होता. मात्र इतके असून सुद्धा नेहमीच अन्याय होणाऱ्या या लालपरीच्या कर्मचा-यांना आता कोरोना लस मिळवण्यासाठी देखील हात पसरावे लागत आहेत. एकीकडे राज्य सरकार नर्स, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, पोलिस यांना प्राधान्याने कोविडची लस देत असताना, राज्य सरकारला आपला विसर पडला की काय?, असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांना पडू लागला आहे.

मुख्यमंत्री साहेब लक्ष कधी देणार?

​एसटी कर्मचाऱ्यांना लस मिळावी यासाठी एसटी संघटनांनी जानेवारी महिन्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. तर परिवहनमंत्री अनिल परब यांना मार्च महिन्यात पत्र लिहिले आहे. मात्र, अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, परिवहन मंत्रीजी तुम्ही आमच्याकडे कधी लक्ष देणार?, असा प्रश्न आता एसटी कर्मचारी विचारू लागले आहेत.

(हेही वाचाः ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा संप: नुसत्या खाटा वाढवता, मनुष्यबळाचे काय? )

‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीतही समावेश नाही

आपले घरदार, गाव सोडून मुंबईत येऊन एसटीचे कर्मचारी सेवा देत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना देखील झाला होता. मात्र याची दखल ना सरकारने घेतली, ना एसटी प्रशासनाने. विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने घोषित केल्यानंतर ‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीत प्रत्यक्षात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पोलिस विभाग आणि महसूल विभागाचाही समावेश करण्यात आला. मात्र, या यादीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नाही.

आतापर्यंत इतके कर्मचारी कोरोनाबाधित

राज्यात लॉकडाऊनमध्ये सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे. आतापर्यंत एकूण 5 हजार 999 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून, जवळपास 147 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर मागच्या 9 दिवसांत 675 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतकं असून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जात नाही. याचमुळे आता एसटी संघटनांसह कर्मचारी देखील संतप्त झाले आहेत.

(हेही वाचाः मोदींनी नेमके कोणत्या ठाकरेंचे ऐकले?)



एसटी कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क हा प्रवाशांसोबत येत असतो. गेल्यावर्षीपासून आमचे 4 हजार कर्मचारी हे मुंबईत आहेत. ते गावी जातात तेव्हा त्यांच्यामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांकडे सरकारने संवेदनशीलपणे बघायला हवे की नाही? आमचा संयम तुम्ही बघू नका, नाहीतर सर्व अवघड होऊन बसेल. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र लिहिले आहे.

-संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना


आम्ही गेल्यावर्षीपासून आमचा जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. आधीच कमी वेतन मिळत आहे. त्यात आता कोरोनाची लस मिळेनाशी झाली आहे. नेहमी एसटी कर्मचाऱ्यांवर हा अन्याय का होतो? राज्य सरकारने सर्व एटी कर्मचाऱ्यांना लस द्यायला हवी.

-एसटी कर्मचारी


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.