-
डॉ. अविनाश भोंडवे
जागतिक हवामान दिनाची सुरुवात १९६१ मध्ये जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या (स्थापना २३ मार्च १९५० रोजी) स्मरणार्थ करण्यात आली. हवामान बदल हा आपल्या संपूर्ण संस्कृतीसाठी एक वास्तविक आणि निर्विवाद धोका आहे. त्याचे परिणाम आधीच दिसून येत आहेत आणि जर आपण आत्ताच उपाययोजना केल्या नाहीत तर ते विनाशकारी ठरतील. ‘सूर्याची बदलती कळा, चाहुल देते उन्हाळ्याची’ कवी अनिल दाभाडे यांच्या या ओळी ऐकताच उन्हाळा सुरू झाला असे जाणवते. मात्र, वास्तविकरित्या पाहायला गेले तर यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. हवामानातील बदल सतत जाणवत आहेत. दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे काहीसे चित्र सध्या आहे. हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत. मात्र आता, विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. ऋतुसंधीकाल जेव्हा सुरू असतो, म्हणजे हिवाळा संपल्यावर उन्हाळा सुरू होतो त्या मधल्या काळामध्ये काही दिवस सकाळी उकाडा आणि रात्री थंडी जाणवते. जागतिक हवामान बदलामुळे जगातील अनेक भागांमध्ये चिंताजनक पर्यावरणीय बदल घडत आहेत. ग्लोबल वॅार्मिंग सोबतच प्रदूषण हे एक मोठे कारण आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दुपारचे वातावरण अधिक उष्ण असते. जंगलतोड हे देखील तापमानवाढीचे कारण आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत एसी, रेफ्रिजरेटर यंत्रसामग्री आपण वापरतो. त्यामुळे हिरव्या पट्ट्यावर परिणाम होतो. वीज प्रकल्प, वाहतूक आणि अन्य गोष्टींसाठी इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत जगात मोठ्या प्रमाणात तापमान वाढवले आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची ऊर्जा अडवतात. सूर्याची किरणे जमिनीवर मोठ्या प्रमाणात येतात आणि उष्णता वाढते. दिवसेंदिवस हा तापमानातील फरक गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. दिवसा उकाडा आणि रात्री थंडी यांच्यातले तापमान या कारणांमुळे वाढत चालले आहे. या वर्षी ते जास्तच जाणवत आहे. त्यामुळे हा उन्हाळाही लवकर सुरू झाला आणि तापमानही उच्च श्रेणीत दिसून येत आहे.
हवामानातील बदलांमुळे रूग्णसंख्येत वाढ
विषम तापमानातील फरक (कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान) हा काही प्रकारच्या विषाणूंना पूरक असतो. या काळात श्वसनसंस्थांचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. इन्फ्लूएंझा, स्वाइन फ्लूचे रूग्ण सध्या दिसून येत आहेत. याकाळात लहान मुलांनादेखील त्रास देणारे काही विषाणू असतात. जसे कांजण्या, निर्जलीकरण, कीटक चावणे आणि डंक. असे श्वसनसंस्थेचे आजार आणि लहान मुलांना त्रास देणारे काही विषाणू दिसून येऊ लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे शरिरातले पाण्याचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशनमुळे मूत्रविकार, मुतखड्याचे रूग्ण दिसून येतात. याशिवाय, उन्हाच्या कडाक्यामुळे शरीराला जो घाम येतो त्यामुळे त्वचेचे आजार उद्भवतात. विशेषकरून गजकर्ण, खाज येणे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे साठे दुषित होण्याची शक्यता जास्त असते. वाहते पाणी अडवल्याने ते दुषित होऊन विषाणू तयार होतात. विशेषत: ग्रामीण भागात वाहणारे पाणी अडवल्याने अनेक आजार उद्भवतात. यात उलट्या, जुलाब हे त्रास तर होतातच, पण टायफॅाईड आणि कावीळचे रूग्ण समोर येऊ लागले आहेत. हवामानातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम ही बाब सामान्य असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रकृतीशी संबंधित कोणतेही रोगाचे लक्षण आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. व्हायरल आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून दम्याच्या रुग्णांनीही अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
भविष्यातील परिस्थिती
पृथ्वीचे हवामान बदलत आहे. हरितगृह वायूंच्या (GHGs) उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे, जागतिक वार्षिक तापमान हे वाढताना दिसत आहे. पृथ्वीच्या इतिहासात हवामानातील नैसर्गिक बदलांच्या गतीच्या तुलनेत जागतिक हवामान वेगाने बदलत आहे. ग्लोबल वॅार्मिंगवर जागतिक स्तरावर अजुनही म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. वृक्ष वाढवा, प्रदूषण कमी करा यासारखे जे उपाय आहेत ते वरवरचे उपाय आहेत आणि ते होत नाहीत, त्यामुळेच ग्लोबल वॅार्मिंग वाढत चाललं आहे. या स्थितीकडे आताच गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंध भागात आता उन्हाळा लवकर सुरू होऊन तो उशिरापर्यंत राहतो. पावसाळा उशिरा सुरू होतो आणि हिवाळ्यात थंडी जाणवत नाही. शीत कटिबंधातले जे देश आहेत तिथे बर्फ जास्त पडतो. मात्र, भविष्यात शीत कटिबंधातील देशांची परिस्थिती ही चिंताजनक होणार आहे. हिमालयाची लांबी, रूंदी कमी होत चालली आहे, असा दावा अनेक रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे वातावरणातील बदल होत राहणार आहे.येत्या काही काळात ग्लोबल वॅार्मिंग मोठ्या प्रमाणात वाढून पाण्याचे दुर्भिक्ष तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात अनेक आजार वाढू शकतात. शिवाय, समुद्रांची लांबी वाढत चालली आहे. त्यामुळे जमिनीवर आक्रमण होत आहे. किनारे मागे हटत चालले आहेत. खारे पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गोड पाणी कमी होत चालले आहे. याचा परिणाम आरोग्यावर निश्चितच येत्या काही काळात विशेषत: २५-३० वर्षांपर्यंत दिसू लागेल.
उन्हाळ्यातील आहारमंत्र
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान हे फार वाढलेले असते, त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते. म्हणूनच आहारात द्रव पदार्थांचा समावेश असावा. प्रौढ व्यक्तीने दररोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे, या दिवसात पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त पाणीच नव्हे तर फळांचे रस, सरबत, शहाळी तुम्ही घेऊ शकता. शक्यतो चहा, कॅाफी घेणे टाळावे. उन्हाळ्यात शीतपेय पिण्याची बऱ्याच तरूणांना सवय असते. कोला मिश्रीत पेय प्यायल्याने खूप तहान लागते आणि शरीरातील पाणीही कमी होते. शीत पेयातील काही घटकांमुळे ह्रदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण वाढते. त्याऐवजी नैसर्गिकरित्या तयार केलेले ताज्या फळांचे रस, पन्हं, कोकम सरबत प्यावे. आहारामध्ये पचनास जड असतील असे पदार्थ टाळावेत. खूप तिखट, तळलेले पदार्थ किंवा मांसाहारी पदार्थ कमी खावेत किंवा शक्य असल्यास खाणे टाळावे. पालेभाजी आणि पोळी – भाजी यावर भर द्यावा.
उन्हाळ्याच्या दिवसांतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताजे आणि घरचे अन्न खावे. बाहेरचे उघड्यावरील खाण्याची सवय जास्त असते, ती टाळावी. कारण, याच काळात पाणी दूषित झालेले असते. त्यामुळे अन्नातून पसरणारे आजार या काळात बळावत असतात. विशेषत: टायफॉइड आणि हिपॅटायटीस. अनेक घरांमध्ये सकाळी स्वयंपाक केला जातो आणि तोच सायंकाळी वापरला जातो. सकाळची ताजी भाजी फ्रिजमध्ये ठेवून रात्री गरम करून खाणे हे चुकीचे आहे. सकाळचे सायंकाळी वापरणे हे सुद्धा शिळे आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने अन्नावर परिणाम करणारे विषाणू जास्त वाढतात आणि अन्न खराब होणे किंवा विषारी पदार्थ तयार होणे ही शक्यता असते. या ऋतूमध्ये नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर ठरते. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्धही असते. या दिवसात चणे देखील आहारात प्रामुख्याने सामील करावेत. काळे आणि हिरवे चणे अधिक प्रमाणात खावेत, कारण याचा परिणाम थंड असतो. यामुळे पोट जड होत नाही आणि भूकही शांत होते.निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणे स्वाभाविक असते, निसर्गाच्या नियमानुसार बदल होतच असतात ते आपल्या हातात नसते. मात्र या बदलांना जुळवून घेणे आपल्या हातात असते. भरपूर पाणी, फळांचे रस, साधा आहार हीच उन्हाळ्यामध्ये तब्येत उत्तम ठेवण्याची गुरुकिल्ली आहे !
शब्दांकन – साक्षी कार्लेकर
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=3iMA8n5CO-g
Join Our WhatsApp Community