-
प्रा. सुरेश चोपणे
गेल्या अनेक वर्षांपासून नासा, युनो, आय. पी. सी. सी आणि अनेक संस्थांनी हवामान बदलाचे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतील असे संशोधन प्रसिद्ध केलेले आहेत. भारताचा विचार केल्यास गेल्या दशकापासून देशाला हवामान बदलाचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. वर्षभर पावसाचे प्रमाण वाढले, मागील वर्षात हिवाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात पाऊस, अति पाऊस, ढगफुटी, उष्ण लहरी, थंड लहरी आपण अनुभवल्या आहेत. वाढलेल्या तापामानाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांत वाढ होणार आहेत. शासन, प्रशासन आजही सावध झाले नाही, तर उद्योग, कृषी, आरोग्य आणि अर्थकारण अशा अनेक क्षेत्रांवर यांचे गंभीर परिणाम होऊन देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस येऊ शकते. ऋतुचक्र बदलणार आहे. उन्हाळ्याचे आणि पावसाळ्याचे दिवस वाढणार आहेत. विकासाच्या नावावर होत असलेला निसर्गाचा ऱ्हास थांबवून यावर आजच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी ह्या संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०२१-२०५० या काळात प्रदुषणाच्या तीव्रतेनुसार १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार असून पाऊस आणि अति पावसाचे दिवस आणि प्रमाण वाढणार असल्याचे पूर्वानुमान काढले आहे. यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना दिलासा मिळणार असल्याचे अहवालात म्हटले असले तरी बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामावर होणार असल्याचे म्हटले आहे. सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आणि IPCC आकडेवारीवरून १९९१ ते २०१९ या ३० वर्षांच्या अभ्यासातून पुढील २०२१ ते २०५० या वर्षादरम्यान महाराष्ट्रातील आणि देशाच्या पश्चिम राज्यातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या प्रमाणावर हवामान बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे. IMD ची आकडेवारी आणि CORDEX मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच जिल्हानिहाय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधीच भारत हवामान जोखीम निर्देशांकात ७व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे हा अभ्यास अतिशय धोक्याची सूचना देतो आहे. (World Climate Day)
(हेही वाचा – अतिक्रमणांनी वेढलेल्या प्रभादेवीतील Matkar Marg वर झाडे बहरुन फुलपाखरेही बागडणार)
तापमान वाढीचा धोका :
असेच वायू प्रदूषण वाढत राहिले, तर येत्या २०२१-२०५० पर्यंत तापमानात २ डिग्री सेल्सियसने वाढ होईल. महाराष्ट्रातील उन्हाळ्यात ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढ होईल. तर हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान वाढ जास्त होईल. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्याचे तापमान मात्र कमी होईल. महाराष्ट्रातील १ पेक्षा अधिक डिग्री तापमान वाढीचे जिल्हे-भंडारा-२.०, अकोला-१.३, अमरावती-१.६, औरंगाबाद-१.१, बीड-१.२, बुलढाणा-१.४, धुळे-१.१, गोंदिया-१.१, हिंगोली-१.२, जळगाव-१.३, लातूर-१.४, नागपूर-१.१, नंदुरबार-१.६, उस्मानाबाद-१.४, वर्धा-१.१, वाशीम-१.२, यवतमाळ-१.१. सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्ह्यात गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (०.८) तापमान वाढ आणि उष्ण लहरी कमी होणार असल्याचे म्हटले आहे. प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला-२.५, अमरावती -२.९, औरंगाबाद 2.९, भंडारा-२.६, बुलढाणा -२.३, धुळे २.२, गोंदिया-२.१, हिंगोली-२.२, जळगाव-२.५, जालना-२.७, नागपूर-२.२, नंदुरबार-२.५, नाशिक-२.४, वर्धा-२.१, वाशीम-२.३, डिग्रीने वाढेल असा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे.
पाऊस आणि मान्सूनचे दिवस वाढणार :
अभ्यासाच्या अनुमानानुसार महाराष्ट्रातील यवतमाळ वगळता सर्वच जिल्ह्यात पावसाचे दिवस ३ ते ९ दिवसाने वाढणार आहे. वाशीम-९, जालना -८, चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा, नंदुरबार – ७. अकोला, बुलढाणा, उस्मानाबाद, पुणे, सांगली, वर्धा-५ दिवस. उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस. अति प्रदूषणाच्या अनुमानानुसार सर्व जिल्ह्यात २ ते ८ दिवस पाऊस वाढणार. वाशीम-८, मुंबई-७, चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा – ६ , अकोला, बुलढाणा, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सांगली, वर्धा- ५. उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस पाऊस वाढणार. पूर्व ते पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण १ ते २९ टक्याने पूर्व-पश्चिम दिशेला वाढत जाईल. गोंदियात १% तर पुणे येथे २९% वाढ होईल. चंद्रपूर-१५% आणि अति प्रदुषणाच्या अनुमानानुसार गोंदियात ३% तर पुणे ३४% वाढीचा अंदाज आहे. सन २०३०-२०५० सरासरी पावसाच्या बाबतीत सर्वाधिक पाऊस वाढणारे जिल्हे-अकोला १७-२५%, भंडारा-१७-२०%, बुलढाणा, चंद्रपूर-१४%, नाशिक-१५-१६%, पुणे २५-२९%, रत्नागिरी-१७-२०%, सातारा-१९-२४%, सोलापूर-१५-१९%, वर्धा-१९-२२%, वाशीम-१८-२१% आणि यवतमाळ-१७-१९%.
खरीप (जून-सप्टे.) हंगामात पावसाची अनियमितता १०% ने वाढेल त्यात औरंगाबाद, रत्नागिरी, आणि मुंबई विभागाचा समावेश असेल. खरीप हंगामापेक्षा अनेक जिल्ह्यात रब्बी (ऑक्टो.-डिसेंबर) हंगामात पावसाचे प्रमाण आणि दिवस वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक वाढ गडचिरोली-१९-२२%, गोंदिया-३३-४३%, नंदुरबार-५७-८१%, उस्मानाबाद-१८-३२%, पालघर-१९-३१%, पुणे-२०-३२%, रायगड-२७-४१%, रत्नागिरी-३९-६१५, सांगली-२३-३३%, ठाणे-२५-४१%, वर्धा-३९-४२% राहण्याचे अनुमान आहे. (World Climate Day)
(हेही वाचा – Gukesh Vs Ashwin Chess : जेव्हा गुकेश आणि अश्विन यांच्यात रंगला बुद्धिबळाचा डाव)
अति पावसाचा धोका :
२०२१-२०५० पर्यंत भंडारा जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात १ ते ५ दिवस अति पावसाच्या (५१-१०० मिमी एक दिवस) घटना वाढणार आहे. सिंधुदुर्ग-५, बुलढाणा-४, हिंगोली, लातूर, बीड, सोलापूर आणि औरंगाबाद ३ घटना. २० जिल्ह्यात २ तर ८ जिल्ह्यात १ घटना. तर अति प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात २ ते ८ घटना (१०० मिमी.एक दिवस) घडतील, त्यात सिंधुदुर्ग-८, बुलढाणा, हिंगोली-५, अहमदनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर आणि वाशीम प्रत्येकी ४ घटना, १५ जिल्ह्यात ३, तर ८ जिल्ह्यात २ घटना घडेल. या अति पावसामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना फायदा होणार आहे – त्यात धुळे, सातारा, सांगली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे ह्यांचा समावेश असेल.
अतिवृष्टीच्या घटना :
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात १ ते २ घटना घडेल. त्यात बुलढाणा, हिंगोली, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, रायगड, सांगली, सातारा येथे २ घटना, उर्वरित जिल्ह्यात प्रत्येकी १ घटना. तर अति प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यात १ ते ३ घटना घडेल. हिंगोली, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, रायगड, सांगली, कोल्हापूर, वाशीम, वर्धा, मुंबई येथे ३ घटना. उर्वरित १६ जिल्ह्यात २ आणि ८ जिल्ह्यात १ घटना घडतील. पावसाचे दिवस वाढतील आणि त्यांचा परिणाम नदीजवळ वसलेल्या नागरी आणि शहरी भागावर पडेल.
शेतीवर परिणाम :
शेतीतील विविध पिकांसाठी कमी-अधिक तापमानाची आणि कमी -अधिक पावसाची गरज असते परंतु वाढलेले तापमान आणि अति पाऊस ह्यामुळे पिकांची नासाडी होईल, रोगराईचे प्रमाण वाढेल आणि एकूणच कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान होईल. (World Climate Day)
(हेही वाचा – Hawkers : दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात अपयश; आता मोठी कारवाई करण्याचा विचार?)
वने, वन्य जीवावर परिणाम :
वृक्षावर कीटकांचे प्रमाण वाढेल आणि वन्यजीवांना होणाऱ्या रोगराईचे सुद्धा प्रमाण वाढेल. जंगलात पाला पाचोळा वाढल्यामुळे वणवा लवकर वाढेल आणि यात असंख्य वन्यजीवांचे बळी जातील.
आरोग्यावर परिणाम :
वाढत्या तापमानामुळे आणि पावसाचे प्रमाण वाढल्याने विविध विषाणू आणि जीवाणूंची वाढ होऊन त्याचा परिणाम रोगराई वाढण्यावर होईल. अति तापमानामुळे आणि उष्ण लहरीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढेल, कामांच्या तासावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. अन्न प्रदूषण हा गंभीर विषय बनला आहे आणि यामुळे देशात लाखो लोकांना कॅन्सर आणि तत्सम रोगांना बळी पडावे लागत आहे.
कारणे आणि उपाययोजना
उत्सर्जित होणारे प्रदूषित वायू, विशेषत: कार्बन डाय ओक्साईडचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर वाढले आहे. तापमान कमी ठेवणारे आणि कार्बन वायुचे प्रमाण कमी करणारी जंगले शेती, उद्योग आणि विकास कामांसाठी तोडली जात आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीवरील वाढती शहरे, गावे, विकासकामे यामुळे जमिनीचे वाळवंटीकरण होत असून त्यामुळे अर्बन हिट आणि परिसरातील उष्णतामान वाढत आहे. आज वाढलेले जागतिक तापमान कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा पुढे १० वर्षे कमी होणार नाही, परंतु तत्काळ उद्योगातून, थर्मल पॉवर स्टेशनमधून उत्सर्जित होणारे वायू प्रदूषण कमी करणे, शहरात आणि ओद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, ग्रामीण भागात, रस्ते, रेल्वे, शेती परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे, लहान बंधारे, तळे इत्यादी जल साठे वाढविणे. निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे, अशा अनेक प्रयत्नांनंतरच जागतिक आणि स्थानिक हवामान बदल रोखले जाऊ शकते. त्यासाठी शासनाने राज्य पातळीवर हवामान बदल किती झाला याचा अभ्यास करावा, कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करावी आणि हवामान बदलाला कारणीभूत घटक तातडीने कमी करावे. (World Climate Day)
(लेखक पर्यावरण आणि हवामान अभ्यासक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community