World Health Day : रुग्णांना लुबाडणाऱ्यांच्या ‘सर्जरी’ची गरज!

225
World Health Day : रुग्णांना लुबाडणाऱ्यांच्या ‘सर्जरी’ची गरज!
World Health Day : रुग्णांना लुबाडणाऱ्यांच्या ‘सर्जरी’ची गरज!
  • वीरेंद्र इचलकरंजीकर

‘साथी’ या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रातील लुटमारीविषयी अभ्यास प्रसिद्ध केला आहे. ‘साथी’च्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आजमितीला साधारण ७० ते ८० टक्के आधुनिक वैद्य हे ‘कट प्रॅक्टिस’च्या (Cut Practice) माध्यमातून पैसे कमावतात. असे धक्कादायक वास्तव असले, तरी प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न ! वैद्यकीय क्षेत्रात चालणाऱ्या ‘कट मनी’विषयी चर्चा होऊ लागल्यावर सरकारने वर्ष २०१७ मध्ये ‘कट प्रॅक्टिस’ (Cut Practice) थांबवण्यासाठीचा कायदा बनवण्यासाठी एक समिती नेमली. सामान्यतः शासकीय समित्या सरसकट मुदतवाढ मागतात आणि त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ घेतल्यानंतरही कण्हत अन् कुंथत त्यांचा अहवाल सादर करतात. त्यानंतर पुन्हा सरकारकडून या नेमलेल्या समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दुसरी समिती नेमण्यात येते. तिही पुन्हा मुदतवाढ मागते; पण येथे निराळेच घडले. ‘कट प्रॅक्टिस’विषयी कायदा बनवण्यासाठी नेमलेल्या समितीने मुदतवाढ न मागता त्वरित अभ्यास पूर्ण केला, ही आश्चर्याची गोष्ट आहे. २८ जुलै २०१७ या दिवशी समितीची स्थापना करणारा शासनाचा आदेश निघाला आणि जेमतेम १ मासात समितीने त्यांचा अभ्यास सादर केला. २५ सप्टेंबर २०१७ या दिवशी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने या कायद्याचा मसुदा त्यांच्या संकेतस्थळावर जनतेच्या अभ्यासासाठी आणि आक्षेप नोंदवण्यासाठी प्रसिद्ध केलेला दिसून येतो. हा मसुदा मी वाचला. मला लक्षात आलेल्या काही गोष्टी खाली देत आहे. (World Health Day)

कायद्यामध्ये अनेक पळवाटा

कलम २ (सी) मध्ये ‘कट्स’ या शब्दाची व्याप्ती किंवा अर्थ अजून नेमकेपणाने केला पाहिजे. अन्यथा त्यामधूनच अनेक आधुनिक वैद्य निसटून जाण्याची शक्यता वाटते. कलम ३ च्या स्पष्टीकरणांमध्ये एक व्याख्या आहे, रुग्णालयाच्या एका विभागातून अन्य विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या रुग्णांना या कायद्यातून सवलत देण्यात यावी. यामध्ये अशी तपासणी अथवा चाचणी अनावश्यक असणे, तेथे वापरण्यात येणारी औषधे, यंत्रे यांच्या आस्थापनांनी रुग्णालयाला अशा वापरासाठी ‘किक बॅक’ किंवा ‘कट मनी’ (दलाली) देणे, हे सुटून जात नाही काय ? (World Health Day)

कलम ३ मध्ये शिक्षा दिल्या आहेत आणि त्यावर स्पष्टीकरणे आहेत. यातले चौथे स्पष्टीकरण संबंधित आस्थापनाच्या/संस्थेच्या अन्य उत्तरदायी व्यक्तींना दोषी ठरवणारे आहे. जर एखाद्या मोठ्या रुग्णालयात ‘कट प्रॅक्टिस’ चालू असल्याचे लक्षात आले, तर त्या रुग्णालयाचे संचालक आणि मुख्य आधुनिक वैद्य यांच्यावरही त्याचा दोष येईल. यामध्ये ते संचालक किंवा मुख्य आधुनिक वैद्य यांना ‘कट प्रॅक्टिस’चालू (Cut Practice) असल्याचे ज्ञात होते आणि त्यांच्या संमतीने ती चालू होती, हे तक्रारदाराने सिद्ध का करायचे ? (World Health Day)

कायद्याच्या मसुद्याविषयी माहिती नाही

वर्ष २०१७ मध्ये कायद्याचा मसुदा प्रसिद्ध झाला; परंतु कायदा बनण्याच्या त्या प्रक्रियेला अर्धांगवात झाला की काय? कारण हा कायदा संमत होण्यासाठी पुढे काहीच झालेले दिसून येत नाही. याविषयी आम्ही माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत विचारले. तेव्हा मिळालेल्या उत्तरामध्ये, ‘याविषयाची धारिका मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये यांच्याकडे १८.५.२०२१ या दिवशी सादर केली आहे’, असे सांगण्यात आले आहे. याहून पुढे ‘कायद्याची प्रत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यांच्याकडे आलीच नाही’, असे सांगण्यात आले. हा मसुदा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई हे प्रसिद्ध करते; परंतु कायद्याची समिती ज्या विभागाने नेमली, तो वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग यासंदर्भात संपूर्ण अज्ञान प्रकट करतो. यात काय ‘कट’ आहे, हे ‘कट प्रॅक्टिस’ (Cut Practice) करणाऱ्यांनाच माहिती असावे, असे समजावे का ? (World Health Day)

अपप्रकार रोखण्यासाठी व्यापक जनरेट्याची आवश्यकता !

यासंदर्भात हिंदू विधीज्ञ परिषदेने एका पत्राद्वारे शासनाकडे त्यांचे मत मांडले आहे. यासंदर्भात आवश्यक झाल्यास याचिकाही प्रविष्ट केल्या जातील. वैद्यकीय क्षेत्रात घुसलेले अपप्रकार काढून टाकण्यासाठी समाजाच्या रेट्याची आणि आंदोलनाची आवश्यकता आहे. चला, आपल्याला आपल्या ठिकाणी जे जमते, जसे जमते ते करायला आणि लढायला आरंभ करूया !’

(लेखक अधिवक्ता आणि हिंदू विधीज्ञ राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.