सध्या जगभरात कोरोना महामारीने नातीगोती तोडली आहेत. हा असा रोग प्लेग नंतर १०० वर्षांनी प्रथमच आला आहे. ज्याची लागण झाल्यावर त्या रुग्णाला एकट्यालाच रुग्णालयात राहावे लागते, त्याच्यासोबत ना कुणी नातलग असतो ना कुणी ओळखीचा केअर टेकर. अशा वेळी लाखो कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांतील परिचारिकाच अशा रुग्णांच्या आई, बहीण बनत असतात. समोर कोणत्याही वयोगटाचा रुग्ण असो त्याची ‘आपला माणूस’ म्हणून या परिचारिका दिवस-रात्र सेवा करत आहेत. १२ मे या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस यानिमित्ताने या कोविड योद्धयांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. यानिमित्ताने नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका दीपाली कार्येकर-राऊत यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला मुलाखत दिली.
रुग्णांची मानसिकता सांभाळतो!
दिवस – रात्र नर्स पीपीई किट घालून वारंवार वॉर्डमध्ये येऊन रुग्णाला सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, ऑक्सिजन लावणे, वयस्क रुग्णाला दैनंदिन कृती करणे शक्य होत नाही, त्यासाठी त्यांना मदत करणे अशा सर्व कृती परिचारिका करत असतात, त्यावेळी त्या रुग्णाला आपले नातलग कुणीही जवळ नाही, या विचाराने ते आधीच घाबरलेले असतात अशा वेळी त्यांची बहीण, मुलगी, मैत्रीण या भावनेने रुग्णांना सांभाळून घ्यावे लागते, वयस्करांना काका, तरुणांना दादा असे संबोधित करून त्यांना धीर देत असतो, असे नवी मुंबई महापालिका रुग्णालयाच्या परिचारिका दीपाली कार्येकर-राऊत यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलत होत्या.
रुग्णसेवा ही राष्ट्रसेवा म्हणून करतो!
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या खूप वाढली आहे. अशा वेळी आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. वैद्यकीय कर्मचारी अपुरे पडत आहेत. तरीही आम्ही डबल ड्युटी करून रुग्णांची सेवा करतो. खरे तर सध्याची परिस्थिती पाहिल्यावर मन हेलावून जाते, नोकरी म्हणून न पाहता रुग्णसेवा म्हणजे राष्ट्रसेवाच आहे, अशी भावना आमच्यात निर्माण झाली आहे, असेही परिचारिका कार्येकर म्हणाल्या. सध्या मृत्यूची संख्याही वाढलेली आहे. काही रुग्ण हलगर्जीपणा करतात. वेळेत उपचार घेत नाही, संसर्ग जास्त वाढल्यावर येतात आणि त्यांच्या जीवाला धोका होता, अशा वेळी हे रुग्ण आमच्या समोर जीव सोडून जातात, तेव्हा खेद वाटतो, पण आमची अशा प्रसंगांची तयारी करून घेतलेली असते. परंतु तरीही मी आवाहन करते कि, कुणीही लक्षणे आढळून आली, तर अंगावर काढू नयेत, त्वरित उपचार घ्यावे, असेही परिचारिका दीपाली कार्येकर म्हणाल्या.
१२ तास पीपीई किटमध्ये राहिल्याने आरोग्य स्वास्थावर परिणाम!
परिचारिकांना कायम कोरोनाच्या वॉर्डात फिरावे लागते, त्यामुळे आम्हाला आमची जेवढी ड्युटी आहे, तेवढ्या १२ तास पीपीई किट घालावी लागते. इतका काळ शरीरावर पीपीई किट घातल्यावर त्याचा त्वचेवर परिणाम होत आहे, मानसिक त्रास होत आहे, तरीही आम्ही त्या सर्व त्रासाकडे दुर्लक्ष करून रुग्णांची मानसिकता स्थिर कशी राहील, यासाठी प्रयत्न करत असतो.
स्वतःच्या जीवाची पर्वा नाही!
आताच्या काळात बहुतांश सर्वच रुग्णालयांमध्ये प्रत्येक परिचारिकांना कोविड रुग्णांची सेवा करावी लागतेच. अशा वेळी पहिल्या लाटेच्या वेळी काही दिवस स्वतःच्या जीवाची काळजी वाटत होती, मात्र आता ही भीती दूर झाली आहे, आता आमच्या मनामध्ये रुग्णांची काळजी असते, परंतु आपल्यामुळे आमच्या घरातील सदस्यांना लागण होऊ नये, अशी भीती मात्र मनात असते, अशी परिचारिका दीपाली कार्येकर म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community