कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो. एखाद्या देशाचा विकास किंवा तो देश मागास होण्यामागे लोकसंख्येचा खूप मोठा वाटा असतो. संपूर्ण जगात येत्या ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. या निमित्ताने अनियंत्रित लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित आणि विचारविनिमय केला जातो.
लोकसंख्या दिनाचा इतिहास –
जागतिक लोकसंख्या दिनाची सुरूवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने १९८९ मध्ये केली होती. जगाची लोकसंख्या ५ अब्जांवर पोहोचली होती, त्यावर संयुक्त राष्ट्रसंघाकडून चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी साजरा केला जात आहे. ११ जुलै १९९० रोजी हा दिवस पहिल्यांदा ९० पेक्षाही जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यासाठी सुमारे ८ उद्दिष्टे आहेत.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा उद्देश –
वाढत्या लोकसंख्येची जाणीव समाजाला करून देणे हा लोकसंख्या दिन साजरा करण्याचा पहिला उद्देश आहे. अनेकांना वाटते की मुलगा असेल तर वंश पुढे चालेल, या इच्छेखातर अनेक मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढवली जाते, ती कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. हा दिवस मुला-मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो. लोकांना त्यांच्या समानतेची जाणीव करून दिली जाते. हा दिवस पाळल्याने लोकांमधील लिंगभेद कमी होईल. लहान वयातच महिलांना माता होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना या दिवशी प्रबोधन केले जाते. लोकांना त्यांच्या हक्कांबरोबरच कर्तव्याचीही आठवण करून दिली जाते. चांगले शिक्षण, आरोग्य आणि जीवनशैलीसाठी लोकसंख्या कमी करणे आवश्यक आहे हे पटवून देण्याकरता हा दिवस महत्वाचा आहे.
(हेही वाचा – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या “परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स” अहवालात महाराष्ट्र सातव्या स्थानावर)
जागतिक लोकसंख्या दिनाची यावर्षीची थीम काय असेल –
जागतिक स्तरावर हा दिवस परिसंवाद, चर्चा, शैक्षणिक सत्रे, सार्वजनिक स्पर्धा, घोषणा, कार्यशाळा, वादविवाद, गाणी इत्यादी आयोजित करून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिनाची एक विशेष थीम असते. त्या थीमच्या आधारे पुढचे वर्षभर जनजागृती केली जाते. यंदाची थीम ही ‘A world of 8 billion: Towards a resilient future for all’ अशी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community