सफाई कामगार कुटुंबाना करणार सन्मानित: प्रशासन घेतंय धोरणात्मक निर्णय

142

मुंबईला स्वच्छ राखण्यात सफाई कामगारांचे योगदान मोठे असून त्यांच्या या कार्याचा बहुमान म्हणून जागतिक स्वच्छता दिनी सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला सन्मानित करण्याचा विचार प्रशासन करत आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

मुंबई स्वच्छ ठेवण्यात महत्वाचा वाटा

मुंबई शहर स्वच्छता कामे, मल:निसारणाची कामे केल्याने असाध्य आजार होऊन, मृत्युमुखी पडलेल्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना जागतिक स्वच्छता दिनी गौरव चिन्ह व विशेष आर्थिक मदत देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक जगदीश ओझा यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केले होते. यात त्यांनी मुंबई महानगरपालिकेमधील सफाई कामगार अगदी घाणीत उतरून, प्रसंगी धोका पत्करून मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याचे काम नित्यनेमाने करीत असतात. घाणीत सतत काम केल्यामुळे, ते असाध्य आजारांना बळी पडतात. महानगरपालिकेचे अनेक सफाई कामगार असाध्य आजारांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याच्याकामात त्यांचा महत्वाचा वाटा असताना देखील त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही वास्तविक, अशा सफाई कामगारांचा गौरव करणे हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरेल, असे म्हटले होते.

(हेही वाचा – …म्हणून वीर सावरकरप्रेमी साजरा करतात ‘मृत्युंजय दिन’)

…एका पात्र वारसास महापालिकेमध्ये नोकरी 

यावर उत्तर देताना घनकचरा व्यवस्थापन विभागाने,सफाई कामगर कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडल्यास नुकसान भरपाई अधिनियम १९२३ नुसार इतर मनपा कामगारांना लागू असलेले नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते, अशी माहिती दिली आहे. तसेच सेवेत असताना मृत्यू, असमर्थता, सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीनंतर एका पात्र वारसास महापालिकेमध्ये नोकरी दिली जाते. शिवाय सफाई कामगार सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या पात्र वारसाला विमा योजनेच्या अंतर्गत रुपये एक लाख रक्कम दिली जाते. सफाई कामगारांचा घाणीशी संबंध येत असल्यामुळे त्यांना त्यांच्या पदानुसार घाणकाम भत्ता दिला जातो. तसेच इतर देय दावे उदा. भविष्य निर्वाह निधीची रक्कम, उपदान, कुटुंब पेन्शन, रजेची थकबाकी, वेतनाची थकबाकी दिले जातात, असे म्हटले आहे.

जागतिक स्वच्छता दिनी होणार गौरव

मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याच्याकामी, घाणीत काम केल्याने असाध्य आजार होऊन, मृत्युमुखी पडलेल्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या कुटुंबियांना जागतिक स्वच्छता दिनी गौरव चिन्ह व विशेष आर्थिक मदत देऊन सन्मानित करण्यात यावे याबाबत ही सूचना स्वागतार्ह आहे त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.