आपल्या जीवनात पाण्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे, त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी २२ मार्चला जागतिक जल दिन साजरा केला जातो. यंदाची जागतिक जल दिन २०२३ची थीम बदलाशी जोडली गेली आहे. यंदाची थीम ‘एक्सेलरेटिंग चेंज’ आहे. जागतिक जल दिननिमित्ताने आज आपण नदीजोड प्रकल्प म्हणजे काय? आणि या नदीजोड प्रकल्पामुळे काय फायदा होणार? याबाबत जाणून घेणार आहोत.
नदीजोड प्रकल्प काय?
नदीजोड प्रकल्प हा गंगानदीसह भारतातील ६० नद्यांना जोडणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या सहाय्याने लाखो शेतजमीन सिंचनासाठी उपलब्ध होईल. हा प्रकल्प तीन भागांमध्ये विभागलेला आहे. तसेच हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण जल संसाधन मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवस्थापित केला आहे.
नदीजोड प्रकल्पाची कल्पना नक्की कोणाची?
नदीजोड प्रकल्पाची कल्पना सर्वात पहिल्यांदा १९१९ साली ब्रिटिश अभियंता ऑर्थर कॉटन यांनी मांडली होती. त्यानंतर सर विश्वेश्वरय्या यांनी १९३५ मध्ये या प्रकल्पाला दुजोरा दिला. मग १९६०मध्ये तत्कालीन मंत्री केएल राव यांनी गंगा आणि कावेरी नद्यांना जोडण्याची कल्पना मांडून ही कल्पना पुनरुज्जीवित केली. यात गंगा नदीचे साठ हजार क्यूसेस पाणी बिहारमधील पाटण्याच्या जवळ वळून सोन, नर्मदा, तापी, गोदा, कृष्णा, पेन्ना अशा मार्गे कावेरीत सोडण्याची योजना मांडली होती. या प्रकल्पाची लांबी २ हजार ६४० किलोमीटर होती. १५० दिवसांमध्ये गंगेचे पाणी कावेरीत नदीत सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. यासाठी १९८२ साली इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय जलविकास संस्थेची स्थापना केली. पण खऱ्या अर्थाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाचा गंभीररित्या अभ्यास करून त्याला योग्य दिशा दिली. या प्रकल्पासाठी सुमारे ५६ अब्ज कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त होता.
नदीजोड प्रकल्पाचे फायदे
भारतात अनेक नद्या आहेत, पण मान्सूनच्या काळात बऱ्याच नद्यांना पूर येतो. दरम्यान देशातील पृष्ठभागावरील एकूण पाण्याच्या ६५ टक्के पाणी वापरले जाते आणि उरलेले पाणी वाहून जाते. त्यामुळे नद्या परस्परांना जोडल्यास पाण्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल, हा नदीजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. नदीजोड प्रकल्प दुष्काळ आणि पुराचा प्रश्न सोडवू शकतो. कारण ज्यावेळेला एखाद्या नदीला पूर येतो, त्यावेळेस ज्या नदीत पाण्याची कमतरता आहे, तिकडे पाणी वळवता येईल. तसेच या प्रकल्पाच्या मदतीने गंगा आणि ब्रह्मपुत्रा क्षेत्राला दरवर्षी येणाऱ्या पुरापासून मुक्तता मिळू शकते. शिवाय सिंचन, जमीन जवळपास १६ टक्क्यांनी वाढेल. १५ हजार किमी नदी आणि १० हजार किमी जलवाहतूक विकसित केली जाईल, त्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून आर्थिकदृष्ट्याही प्रश्न सुटणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीचे चित्र निश्चितच बदलून जाणार आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांनाही नोकऱ्या मिळणे शक्य होईल. परिवहन आणि पर्यटनातही विकास होईल. औष्णिक विद्युतनिर्मिती वाढेल.
(हेही वाचा – पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ! नागरिक भयभीत, तब्बल दोन तासानंतर केले जेरबंद; पहा व्हिडिओ)
Join Our WhatsApp Community