दिल्ली ते मुंबई 1 हजार 350 किमी. लांबीचा ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येत आहे. हा जगातील सगळ्यात लांब द्रुतगती महामार्ग असणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे 6 राज्यांना अवघ्या 13 तासांत जोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे भारताच्या नावे नवा विक्रम नोंदवण्याच्या तयारीत हा महामार्ग असल्याचं समजलं जात आहे. हा द्रुतगती महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना जोडणार आहे.
मिळणार कोट्यावधींचा महसूल
विशेष म्हणजे वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या प्रकल्पात केला जाणार आहे. तसेच, जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक स्वतंत्र आवार तयार करण्यात येणार आहे. 2023 मध्ये दिल्ली- मुंबई द्रुतगती महामार्ग तयार झाल्यानंतर केंद्राला प्रत्येक महिन्याला 1 हजार ते दीड हजार कोटी महसूल प्राप्ती होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
(हेही वाचाः तर तुला सोडणार नाही… गडकरी कंत्राटदाराला काय म्हणाले होते? वाचा किस्सा)
एनएचएआय संस्था होणार सोन्याची खाण
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण (एनएचएआय) ही भारत सरकारची स्वायत्त संस्था उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने सोन्याची खाण म्हणून उदयाला येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. एनएचएआय ही संस्था भारतातील पायाभूत सुविधांच्या मोहिमेचे नेतृत्व करते, ती सध्याच्या घडीला 40 हजार कोटी कमावते. ती येत्या 5 वर्षांत 1 लाख 40 हजार कोटी कमावेल, असं गडकरी यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रीक महामार्गाचे स्वप्न
विजेवर चालणारी वाहनं ही लहान रस्त्यांवरील वाहनांपर्यंत मर्यादित न राहता, बस, ट्रक आणि रेल्वे इंजिन यांना सुद्धा विजेवर चालणा-या वाहनांमध्ये जोडण्याचा विचार केला जात आहे. इलेक्ट्रीक महामार्ग देखील लवकरच बनवण्याचं माझं स्वप्न आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचा हा प्रकल्प मार्च 2023 पर्यंत तयार होणार आहे. हा द्रुतगती मार्ग मुंबईच्या नरीमन पॅाईंट येथे संपणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचाः कोविड काळात गडकरी असे कमावतात दरमहा चार लाख)
Join Our WhatsApp Community