स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई विनायक सावरकर (Yamunabai Savarkar) यांची ८ नोव्हेंबर या दिवशी पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रकार्याला यमुनाताई यांची भक्कम साथ होती. सामान्यतः महामानवांचे कार्य, त्यांचे उत्तुंग विचार समाजासमोर येतात; मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहाणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांच्या कार्याची, त्यागाची फारशी प्रसिद्धी होत नाही. यमुनाबाई सावरकर हेही असेच प्रसिद्धीच्या झोतापासून काहीसे दूर असलेले मात्र सावरकरांच्या प्रखर राष्ट्रप्रेमी विचारांचा वारसा जपलेले व्यक्तिमत्व ! ८ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार येथे प्रसिद्ध करत आहोत. गांधीवध अभियोगातून निष्कलंक मुक्तता झाल्यावर महिलांच्या वतीने १९५० मध्ये पुणे येथे सौ. माईंचा प्रकट सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर म्हणून माईंनी छोटेसे भाषण केले होते. तेच येथे देत आहोत…
(हेही वाचा – Raigad जिल्ह्यात ७ पैकी ३ ठिकाणी मविआला शेकापचे आव्हान; महायुतीमध्ये आलबेल)
‘हिंदु भगिनींनो !
तुम्ही सर्व जणींनी माझा आज जो सत्कार केलात, त्याविषयी कित्ती कित्तीतरी आभार मानावे, असे वाटते मला मनातल्या मनात ! पण ते बोलून कसे दाखवावे, ते साधत नाही मला. त्यातही अशा मोठ्या सभेत बोलण्याची तर सवयच नाही मला मुळी. म्हणून मला जे काही वाटले, ते मोडक्या तोडक्या भाषेत लिहवून घेऊन मी ते वाचवून दाखविण्यासाठी अध्यक्षांना विनंती केली आहे.
माझ्या लहानपणी ‘अभिनव भारत’ ह्या प्रख्यात गुप्त संस्थेच्या अनेक स्त्रीशाखाही असत. त्यापैकी एका शाखेत माझ्या जाऊबाई कै. येसूवहिनी ह्यांच्या सांगण्यावरून मीही आपल्या हिंदु धर्माच्या गौरवासाठी आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या सर्वस्वाचा होम करण्याची शपथ घेतली होती, त्या वेळी माझ्या सांगाती ज्या माझ्या नात्यागोत्याच्या नि मैत्रिणीतील स्त्रियांनी ते दिव्यव्रत घेतले होते, त्यापैकी कितीतरी जणींच्या घरा-दारांवर त्या व्रतापायी पुढे नांगर फिरला. कित्येकींच्या संसारांची होळी झाली, भर तरुणपणी आपापले वीर पति धर्मकार्यी बळी पडल्यामुळे किती जणी झुरत झुरत मरणी मरुन गेल्या. माझ्या ओळखीच्या असल्यामुळे त्या साऱ्या वीर महिलांची नावे आज सांगून टाकावी म्हणून कशी अगदी ओठाशी येत आहेत माझ्या ! पण माझ्या ओळखीच्या नसल्या तरी त्याचे देशस्वातंत्र्याच्या युद्धांत तशाच झुंजत पडलेल्या साऱ्या भरतखंडांतील किती तरी वीर स्त्रियांची नांवे मी ऐकली आहेत. त्यांतहि गेल्या अगदी चार-पांच वर्षांचे आंत आपल्या हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सहस्त्रावधी हिंदु भगिनींनी पूर्वीच्या चितूरच्या जोहारांनाही मागे सारणारे जोहार काश्मीर, बंगाल नी सिंध प्रांतांतून केलेले आहेत नाही का? त्यांची ती सहस्त्रावधी पवित्र नावे कुठवर सांगावी? त्या हिंदूंवीर स्त्रियांची नावे न सांगता केवळ माझ्या ओळखीच्या म्हणूनच काही वीर भगिनींची तेवढी नावे घेईन मी, तर तो पक्षपातच होईल एका अर्थी. यासाठी आपल्या हिंदु राष्ट्राच्या नि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलिदान करणाऱ्या त्या सहस्त्रावधी हिंदुवीर महिलांच्या समुच्चयासच मी कृतज्ञपणे नि विनित भक्तिभावाने वंदन करते प्रथम !
आणि नंतर माझ्यापुरते इतकेच म्हणते की, मी लहानपणी अभिनव भारतात ‘हिंदु राष्ट्राच्या गौरवासाठी जे व्रत घेतले त्यापायी माझ्या वाट्याला जे कर्तव्य आले, ते यथाशक्ती पार पाडण्यास नि त्या कार्यी कोसळलेली संकटे सोसण्यास ज्या देवाने मला धैर्य दिले नि माझ्याकरवी ते निभावून घेतले, त्या देवाचे मी वारंवार आभार मानते.
तुळशीचे पान ते काय ! पण देवाच्या पायावर पडून ते कोमजले की निर्माल्य म्हणून साधुसंतही त्याला मस्तकी धरतात, माझीही गत आज तशीच झालेली दिसते. मी म्हणजे एक पालापाचोळा ! देवाच्या पायांवर वाहिले जाऊन कोमेजले इतकेच माझे भाग्य म्हणून काय ते माझ्या जीवनाच्या वा निर्माल्याला तुम्ही थोरथोर भगिनी आज सत्कारित आहात अर्थात् हा सत्कार या निर्माल्याचा नसून तो वस्तुतः आहे त्या देवाचा !
‘अभिनव भारताच्या ज्या शाखेत मी लहानपणी जाई तिथे काही बोधवचने लावलेली असत. त्यांतील समर्थांचे एक वचन मला अजून आठवते. त्याच वचनातील अभिप्रायास अनुसरून मी या माझ्या भाषणाच्या शेवटी माझा संदेश म्हणून उगवत्या पिढीस जो देत आहे, तो हाच की, आपण स्वपराक्रमाने जे स्वातंत्र्य नि स्वराज्य आज संपादिले आहे ते –
।। आहे तितुके जतन करावे ।।
।। पुढे आणिक मेळवावे ।।
।। हिंदुधर्मराज्यचि करावे ।।
।। जिकडे तिकडे ।।
हिंदुधर्म की जय ! हिंदुराष्ट्र की जय ! वंदेमातरम् !!! (Yamunabai Savarkar)
(वीरपत्नी यमुनाबाई सावरकर या पुस्तकातील संपादित अंश)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community