स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या, ‘यशोगीत सैनिकांचे’ या पुस्तकाचे गुरुवारी 13 मे रोजी मुंबईत प्रकाशन करण्यात आले. 1857 ते 1947 या 90 वर्षांच्या कालखंडातील क्रांतिकारकांच्या साहसपूर्ण कार्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे.
दडलेला इतिहास होणार प्रकाशमय
देशात सशस्त्र क्रांतिकारकांनी सहन केलेल्या यातना, त्यांच्या कुटुंबियांनी सोसलेले कष्ट हे सर्व अहिंसेच्या प्रचारामुळे दडपण्यात आले. 1857 पासून धगधगत असणारी क्रांतीची मशाल पुढील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या साहसाच्या जोरावर प्रज्वलित ठेवली. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले, याबाबत तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांनी सुद्धा कबुली दिली आहे. हा इतिहास प्रकाशमय करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असल्याचे, स्वामिनी सावरकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर )
सावरकरांच्या शब्दप्रभुत्त्वाचीही पुस्तकातून प्रचिती
सध्याचा काळ हा संघर्षाचा काळ आहे. यापुढे होणारे युद्ध हे अटळ आहे. त्यासाठी आपल्या इतिहासातील क्रांतिकारकांचा जागर करणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या असामान्य कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असेही स्वामिनी सावरकर यांनी म्हटले आहे. या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दप्रभुत्त्वाचाही अनुभव वाचकांना मिळेल व त्यातून शौर्याची स्फूर्ती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकरः एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व… वज्रनिश्चयी ‘क्रांतिकारक’ आणि थोर ‘समाजसुधारक’- डॉ. नीरज देव)
या पुस्तकासाठी अरुण बक्षी आणि अनुराधा खोत यांनी संशोधन सहाय्य केले असून, विद्याधर ठाणेकर यांनी हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. संशोधन कार्यात सर्वश्री कुबेर, पत्रकार अशोक शिंदे, आनंद मुंजे यांनीही सहभाग घेतला आहे. अधिक माहितीसाठी विद्याधर ठाणेकर यांच्याशी 9821561344 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णा प्रकाशनातर्फे करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community